मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loksabha Election : लग्न मंडपातच नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ

Loksabha Election : लग्न मंडपातच नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 11:34 PM IST

bride grooms took oath to vote : लातूर शहरात पार पडलेल्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली. परिसरात हा चर्चेचा विषय होता.

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ
नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दोन टप्पे पार पडले आहेत. राज्यात ५ टप्प्यात मतदान पार पडणार असून तिसरा टप्पा ७ मे रोजी आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात सर्वात कमी मतदानाचा टक्का नोंदवला गेला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमा अंतर्गत लातूर शहरात पार पडलेल्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

लातूर शहरातील श्रीनिवास मंगल कार्यालयात हाके व पांढरे परिवारात लग्न सोहळा पार पडला. उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे यांची कन्या पूजा यांच्या लग्न समारंभात निवडणूक अधिकारी उपस्थित होते. त्यांनी वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे व लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. 

चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३६९उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील ७१उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या :

 नंदुरबार ११, जळगाव १४, रावेर २४, जालना २६, औरंगाबाद ३७, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, शिर्डी २०, बीड  ४१ अशी आहे. या ११मतदारसंघांमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे

मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी ७ नामनिर्देशनपत्रे दाखल -

मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.  यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांचा समावेश आहे.

मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी दोन उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अनिल देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+२ अर्ज), राहुल शेवाळे (शिवसेना) (१+३ अर्ज) यांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग