निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्रजी पवार’ पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाकडून या चिन्हाचे आज रायगड किल्ल्यावरुन अनावरण करण्यात आले. यावरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
राज ठाकर म्हणाले मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालाय. राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना लोकांनी वठणीवर आणलं पाहिजे. नाहीतर आणखी चिखल होईल.. नुसतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हाव हे वाटणं हे ठीक आहे. पण खालच्या पातळीवर विचित्र राजकारण सुरु आहे. ज्या तरुणांना राजकारणात यायचंय त्यांना हा आदर्श देणार आहोत का? महाराष्ट्रातील जनतेने सर्वांना वठणीवर आणलं तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्राचं काही खर नाही.
पुण्यात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या १०० व्या नाट्य संमेलनातील एक किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले की, मला राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भेटले, त्यंना विचारले तुम्ही राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचे? तेव्हा दोन-तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटाचे. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
संबंधित बातम्या