देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून अनेक पक्षाने आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने आतापर्यंत १०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अनेपक्षित नावांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव मधील रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सुनबाईपुढे सासरे माघार घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
रावेरमधून भाजपने रक्षा खडसेंना मैदानात उतरवल्यानंतर शरद पवार,एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार का?याचं उत्तर दिलं आहे.
रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत विचारल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. येत्या काही दिवसात महाविकास आघाडी रावेर मतदारसंघात उमेदवार जाहीर करेल. त्यावेळी समजेल की, सामना चुरशीचा होईल असं एकनाथ खडसे म्हणाले.
पुढे खडसे म्हणाले की, रोहिणी खडसे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. तसंच प्रकृतीच्या कारणामुळे मी ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगणार नाही, असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
महाआघाडीकडून रावेरमधून ७ ते ८ जण इच्छुक आहेत. काही उमेदवारांची छाननी करण्यात आली असून उद्यापर्यंत उमेदवाराची निवड करण्यात येईल. रावेरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार असून जिंकणारही असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.