भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी टिळकांनी दिली होती लेबर पार्टीला २ हजार पौंडची देणगी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी टिळकांनी दिली होती लेबर पार्टीला २ हजार पौंडची देणगी

भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी टिळकांनी दिली होती लेबर पार्टीला २ हजार पौंडची देणगी

Feb 14, 2024 01:30 PM IST

भारत स्वतंत्र होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकणारं 'डिव्हाइन एजिटेटर्स- टिळक अँड हार्डी' हे पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी टिळकांनी दिली होती लेबर पार्टीला २ हजार पौंडची देणगी
भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी टिळकांनी दिली होती लेबर पार्टीला २ हजार पौंडची देणगी

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावं यासाठी लोकमान्य टिळक यांनी १९२०च्या दशकात ब्रिटन दौऱ्याच्यावेळी लेबर पक्षाला २ हजार पौंडची देणगी दिली होती. या देणगीची पावती सापडली असून भारत स्वतंत्र होण्यासाठी टिळकांनी दाखवलेल्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकणारं 'डिव्हाइन एजिटेटर्स- टिळक अँड हार्डी' हे पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकावर नुकतीच मुंबईत प्रेस क्लब येथे चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत पुस्तकाचे लेख उमाकांत तासगावकर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले, ज्येष्ठ पत्रकार सरोश बाना, लंडनस्थित दिलीप आमडेकर यांनी भाग घेतला.

याविषयी बोलताना माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले म्हणाले, ‘लोकमान्य टिळक इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी १९१७ साली जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी रशियन राज्यक्रांतीची एक महत्वाची घडामोड घडली होती. टिळक ब्रिटनला गेल्यानंतर तेथे घडणाऱ्या घडामोडी त्यांनी पाहिल्या होत्या. खासकरून ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचं आंदोलनाचा त्यांच्यावर प्रभाव पडल्याने त्यांच्या दृष्टिकोनात बदल झाला आणि त्यांच्या राजकारणाची दिशाही बदलली होती. त्यानंतर टिळकांनी मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गाचे मुद्दे हातात घ्यायला सुरूवात केली. भारतीयांना एकत्रित आणण्यासाठी गणेशोत्सव, शिवजयंती सारखे कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात उत्सव म्हणून साजरे करण्यास सुरूवात केले होते’. असं गोखले म्हणाले. टिळकांनी ब्रिटनच्या मजुर पक्षाला २ हजार पौंडाची राजकीय देणगी दिली होती. त्याचा पुरावा पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांनी शोधून काढण्याचे महत्वाचे काम केले आहे. ‘डिव्हाइन एजिटेटर्स: टिळक अॅण्ड हार्डी’ हे लोकमान्य टिळक यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करणारे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. पुस्तकासाठी लेखक तासगावकर आणि त्यांना याकामी मदत करणारे लंडनस्थित दिलीप आमडेकर यांचं मी अभिनंदन करतो, असं गोखले म्हणाले.

सामाजिक सुधारणांच्या मुद्दाबाबत टिळकांचे विचार हे महात्मा ज्योतिबा फुले आणि गोपाल कृष्ण गोखले यांच्यापेक्षा विचार वेगळे होते. श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्यावर रशियन राज्यक्रांती, लेनिनसोबतच टिळकांच्या विचाराचाही प्रभाव होता, अशी माहिती गोखले यांनी दिली. टिळकांच्या मृत्युनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून मुंबईतला कामगार वर्ग संपावर गेला होता, ही त्या काळातली वेगळी घडामोड होती.

लंडन स्थित दिलीप आमडेकर म्हणाले की पहिल्यांदा त्यांनी देणगीची पावती पाहिली तेव्हा प्रश्न पडला की  टिळकांना स्वतःला भारताच्या नागरिकांनी देणगी देऊन ब्रिटनला पाठवलं होतं. त्यामुळे प्रत्येक पैशाचा उपयोग हा भारताच्या स्वातंंत्र्यासाठी व्हावा, हे त्यांचे ध्येय होते. टिळक आणि ब्रिटनच्या लेबर पक्षाचे संस्थापक केएर हार्डी यांच्यात झालेल्या पत्रसंवादावरून त्यांच्यातील संबंधाची कल्पना येते. हार्डी टिळकांना सर्वप्रथम १९१७ साली भारतात पुण्यात भेटले होते. जात, धर्म, वंशाविरहित मनुष्याजातीतली समानता हा त्यांच्या भेटीदरम्यानचा पाया होता. १९० वर्षाच्या कालखंडात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल ४५ ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती लुटून नेल्याचा अंदाज आहे. ब्रिटनला एवढी संपत्ती गेल्यामुळे भारत गरीब झाला असल्याचे आमडेकर म्हणाले. भारतावर राज्य करताना ब्रिटिशांचा धर्मांतर करण्याचा हेतू नव्हता. तर येथून भारतीयांच्या नकळत, छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेऊन जाण्याचा हेतू होता. आणि यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले, असं आमडेकर म्हणाले.  

टिळक आणि मोहम्मद अली जिनांच्या संबंधावर प्रकाश

लोकमान्य टिळक यांना शिक्षा होऊन मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं त्यांना शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश डावर यांना ब्रिटिश सरकारकडून पुरस्कार म्हणून ‘नाइटहूड’ हा खिताब देण्यात आला होता. मोहम्मद अली जिनांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं. परंतु त्यांनी ते नाकारलं. टिळकांना शिक्षा ठोठावून न्यायमूर्ती डावर यांनी भारताचे नुकसान केले आहे, असं जिना म्हणाले होते. बॅरिस्टर जिना हे ते टिळकांचे मित्र होते आणि स्वतंत्र विचार करणारे नेते होते, असं आमडेकर म्हणाले. टिळक इग्लंडला गेल्यानंतर पूर्ण बदलले होते. तेथे ते लेबर पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटले होते. ब्रिटिश भारतात ज्या पद्धतीने शासन करताएत ते चुकीचे असून भारताची लूट करताएत, समानता, बंधुभाव आणि लोकशाहीच्या तत्वांचा भंग करताएत असं टिळक ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना म्हणाले होते, असं आमडेकर यांनी सांगितलं. ब्रिटिशांविरुद्ध लढायचं असेल तर भारताकडे तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे, असं टिळकांना वाटत होतं. त्यांनी नेपाळच्या राजाच्या मदतीने नेपाळमध्ये एके ठिकाणी मशीनगनचा कारखाना स्थापन करण्याची योजना आखली होती, अशी माहिती आमडेकर यांनी सांगितलं.

टिळकांनी लेबर पक्षाला दोन हजार पौंडची देणगी दिल्याची पावती दिलीप आमडेकर यांनी लंडनच्या महाराष्ट्र मंडळात पाहिली तेव्हा याविषयी अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता त्यांच्या मनात जागृत झाली, अशी माहिती पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांनी दिली. भारतात ब्रिटिशांचा विरोध करत असताना टिळकांनी ब्रिटनमध्ये जाऊन देणगी का दिली?, हे किती फायद्याचं होतं हे सर्व या पुस्तकात मांडलं असल्याचं तासगावकर यांनी सांगितलं. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर