Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

May 19, 2024 08:18 PM IST

Mumbai Lok Sabha : मतदानाची पूर्वतयारी करत असतानाच एका प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे,तर एका होमगार्डला हृदयविकाराचा झटका आला आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू
मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. देशात आणखी दोन मतदानाचे टप्पे शिल्लक असले तरी महाराष्ट्रातील मतदानाचा उद्या पाचवा व शेवटचा टप्पा असणार आहे.  यामध्ये मुंबईतील सर्व ६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मतदानाची पूर्वतयारी करत असतानाच एका प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे, तर एका होमगार्डला हृदयविकाराचा झटका आला आहे.

मुंबईत मतदानाच्या एक दिवस आधीच मुंबईच्या वडाळा मतदारसंघातील प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. सुनिल लक्ष्मण गवळी (५६) असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. बुथ क्रमांक १८९ मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईच्या दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील सेंट पॉल शाळेत ही घटना घडली. ५६ वर्षांच्या सुनिल गवळी यांच्या अचानक छातीत दुखायला लागलं व ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या एका घटनेत अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणूक बंदोबस्ताकरता असलेल्या होमगार्डला हृदयविकाराचा धक्का आला. विजय रुपसिंग राठोड असं या होमगार्डचं नाव असून ते २९ वर्षांचे होते. विजय राठोड हे मूळचे साताऱ्याचे आहेत. काल रात्री हृदयविकाराचा धक्का लागल्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 

मुंबईत उद्या काय बंद आणि काय सुरू? वाचा -

सोमवारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये दारूची दुकाने बंद राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदानाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ज्या भागात निवडणुका होतात आणि लगतच्या भागात ड्राय डे पालन करणे बंधनकारक आहे. २० मे २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता बार आणि वाईन शॉप सुरू होणार आहेत. निकाल जाहीर होईपर्यंत मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ४ जून रोजी मुंबईत आणखी एक ड्राय डे पाळण्यात येणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर