कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांनी मैदानात उतरले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शाहू महाराजांचे निवासस्थान न्यू पॅलेसमध्ये जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीची राज्यभर चर्चा सुरू आहे.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतून निश्चित झाली आहे. शिवसैनिकांनी ठरवलं आहे की, पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत.हे वचन मी त्यांना दिलं आहे. कारण हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी प्रचाराला तर येणारच आहे, पण विजयी सभेलाही येणार आहे.
सध्या आम्ही जी लढाई लढत आहोत त्यामध्ये विजयी होण्यासाठी मी महाराजांचे आशीर्वादही घेतले आहेत. शिवसेनाप्रमुख असताना १९९७-९८ साली आलो होतो, त्यानंतर आज मी महाराजांकडे आलो आहे, यापुढेही येत राहील. बाकी इतर गोष्टींवर मी प्रचारसभेत बोलेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे शाहू महाराज यांच्या भेटीदरम्यान मालोजीराजे,मधुरीमा राजे उपस्थित होत्या. मात्र या भेटीदरम्यान माजी खासदार संभाजी राजे अनुपस्थित होते. संभाजीराजे नियोजित दौऱ्यासाठी राधानगरी परिसरात कार्यकर्ता मेळाव्याला गेल्याचे समजलं.