लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणाऱ्या काँग्रेसच्या जागांची संख्या ९९ वर अडकली होती. मात्र महाराष्ट्रातील अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी १ लाखांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करून विशाल पाटील विजयी झाले आहेत. आज विशाल पाटील यांनी विशाल कदमांसोबत दिल्ली गाठून काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली व त्यांना आपल्या पाठिंब्याचे पत्र सोपवले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले. सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे. सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं सांगितले. विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठले आहे.
सांगली मतदारसंघातील जवळपास सर्व मतदारसंघातून विशाल पाटील यांना चांगलं लीड मिळालं. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी मताधिक्य मिळवत लाखांच्या फरकाने विजय मिळवला.
सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा न करता मिरजेच्या जाहीर सभेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सांगलीतून विशाल पाटील इच्छुक होते. विशाल पाटील व विश्वजीत कदमांनी उमेदवारीसाठी दिल्ली गाठून वरिष्ठांना आपली भूमिका सांगितली तसेच उद्धव ठाकरेंना विनंती केली की, त्यांनी सांगलीबाबत पुनर्विचार करावा.
मात्र काँग्रेसचा विरोध डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून दणदणीत विजय मिळवला. ठाकरे गटाचा विरोध डावलून सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला. त्यामुळे निवडून आल्यावर विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.