लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज अनेक ठिकाणी मतदान होत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदार प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रायगड व कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे मतदान करण्यासाठी गेलेल्या दोन मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथे उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला तर कोल्हापूरमध्ये मतदान केंद्राबाहेरच ६१ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur Lok Sabha Election 2024) मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. मतदानासाठी आलेल्या वृद्धाला हृदयविकाराचा झटकाआला व जागीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रात घडली. महादेव श्रीपती सुतार (वय ६९) असे या वृद्ध मतदाराचं नाव आहे.
महादेव सुतार हे उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान करण्यासाठी गेले होते. सकाळच्या सुमारास मतदानासाठी मोठी रांग असल्याने ते रांगेत उभे होते. त्यावेळी अचानक महादेव सुतार यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यानंतर मतदान केंद्रावरील लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यांना नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मतदान करण्यासाठी निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रकाश केशव चिनकाटे (रा. किंजळोली दाभेकर कोंड) असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे. चिनकाटे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मतदान करण्यासाठी जात होते. मात्र मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर ते चक्कर येऊन रस्त्यातच कोसळले. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्यांना उचलून घरी नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. प्रकाश चिनकाटे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्यात टप्प्यात आज सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बारामती, माढा, रायगड, रत्नागिरी, हातकणंगले आणि धाराशिव या ११ मतदारसंघात मतदान होत आहे.