लोकसभा निवडणुकीसाठी आज पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील लोकसभेच्या४८जागांसाठी पाचही टप्प्यांचे मतदान संपले आहे. आता४जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान संपताच शरद पवार गटाचे (sharad pawar group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलं आहे.त्यात लिहिले आहे की,लढाई अद्याप संपली नसून,आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे.
जयंत पाटील यांनी लिहिलं आहे की, २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे. जे आपल्याला सोडून गेले,ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानांवर नेऊन बसवायचे आहे,असं आवाहनही त्यांनी आपल्या पत्रातून केलं आहे.
जयंत पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेब यांच्या या कुटुंबाचे सदस्यच आहोत. गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत. ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता, विचार आणि मूल्यांची आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हा काही आजचा नाही. तो गेली साडेतीनशे वर्ष होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची बाजी लावली पण दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी तर मृत्यू पत्करला मात्र ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. आदरणीय पवारसाहेब हे याच महापुरुषांचे वैचारिक वारसदार आहेत, ते दिल्लीसमोर का झुकतील? काही अदृश्य शक्तींनी आपले पक्ष, चिन्ह काढून घेतले आहे, मात्र जे गेले त्याचा शोक करायचा नाही, मोठ्या ताकदीने समोर येणारी लढाई लढायची हाच आपला विचार आहे.
या पत्रात जयंत पाटील पुढे लिहितात की, आपण सर्वांनी एकत्र येऊन पाशवी शक्तींच्या विरोधात लढायचे ठरवले आहे. ही लढाई महाराष्ट्रात आणि देशात रोजगाराची निर्मिती व्हावी, शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा, शोषितांचे दुःख दूर व्हावे, यासाठीची ही लढाई आहे. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्व जण मोठ्या ताकदीने'टीम शरद पवार' या भावनेने काम केले. राज्यातील जनतेने प्रचंड असा विश्वास आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतांच्या संख्येच्या रूपात ते आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईलच, असी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
मात्र ही लढाई संपलेली नाही. आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे. २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे. जे आपल्याला सोडून गेले, ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बाधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानांवर नेऊन बसवायचे आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आपण सर्वांनी केलेल्या अथक परिश्रमाच्या बद्दल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच नव्या लढाईसाठी सज्ज होऊन शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, असे आवाहनही पत्राच्या शेवटी जयंत पाटील यांनी केले.
संबंधित बातम्या