LS Election 2024: वंचितनं एकही जागा जिंकली नाही, पण ‘या’ मतदारसंघात बिघडवला महाविकास आघाडीचा खेळ!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  LS Election 2024: वंचितनं एकही जागा जिंकली नाही, पण ‘या’ मतदारसंघात बिघडवला महाविकास आघाडीचा खेळ!

LS Election 2024: वंचितनं एकही जागा जिंकली नाही, पण ‘या’ मतदारसंघात बिघडवला महाविकास आघाडीचा खेळ!

Jun 06, 2024 03:47 PM IST

Vanchit Bahujan Aghadi: महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा सर्व ३५ जागांवर पराभव झाला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला एकही जागा जिंकता आली नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला एकही जागा जिंकता आली नाही.

Lok Sabha Election 2024 Result: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं झाली. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. परंतु, त्यांच्या उमेदवारांमुळे इतर पक्षातील काही उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे बोलणे वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत, जिथे उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा जास्त मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले.यासाठी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या इतर नेत्यांशी अनेकवेळा चर्चा केली. परंतु, या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने वंचितला पाच जागा देण्याचे मान्य केले. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी अधिक जागांची मागणी करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, ज्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढले असते तर, उद्धव ठाकरे यांच्या आणखी तीन जागा निवडून आल्या असत्या.

१) बुलढाणा मतदारसंघ

प्रतापराव जाधव (शिवसेना, शिंदे)- ३ लाख ९ हजार ८६७ मत

नरेंद्र खेडेकर (शिवसेना, ठाकरे)- ३ लाख २० हजार ३८८ मत

वसंतराव मगर (वंचित) ९८ हजार ४४१ मत

- नरेंद्र खेडेकरचा २९ हजार ४७९ मतांनी पराभव

२) हातकणंगले मतदारसंघ

धैर्यशील माने (शिवसेना, शिंदे )- ५ लाख २० हजार १९० मत

सत्यजीत पाटील (शिवसेना, ठाकरे)- ५ लाख ६ हजार ७६४ मत

दादगोंडा पाटील (वंचित)- ३२ हजार ६९६ मत

- सत्यजीत पाटलांचा १३ हजार ४२६ मतांनी पराभव

३) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ

रवींद्र वायकर (शिवसेना, शिंदे)- ४ लाख ५२ हजार ६४४ मत

अमोल किर्तीकर (शिवसेना, ठाकरे)- ४ लाख ५२ हजार ५९६ मत

परमेश्वर रणशूर (वंचित)- १० हजार ५२ मत

-अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव

या निवडणुकीत वंचितने ३५ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. परंतु, त्यांनी ज्या ७ जागांवर पाठिंबा दर्शवला, त्यापैकी तीन जागा निवडून आल्या आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर