Prakash Ambedkar On PM Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकांची लगबग सुरू असून १३ मार्चनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अजूनही राज्यातील महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीकडे तीन जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे बोललं जात आहे. यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही महाविकास आघाडीत अजून सामील झालेलो नाही. आम्ही जर स्वबळावर लढलो तरी आमची थेट लढत भाजपसोबत असेल. त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्याविरोधात अकोला मतदारसंघातून लढावं, असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील ज्या मतदारसंघात वंचितची ताकद आहे, अशा मतदारसंघाची माहिती महाविकास आघाडीकडे दिली आहे. महाआघाडीचे जागावाटप करताना १५ जागा ओबीसीसाठी आणि ३ अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवण्याची आमची मागणी आहे. मात्र माध्यमांमध्ये या आमच्या अटी असल्याचं दाखवण्यात येत आहे. आम्ही त्यांच्याकडे आमचं म्हणणं मांडलंय, त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जावू नका असे म्हटलं होतं. मात्र १५ जागांवरचा तिढा सुटला तर पुढे निर्णय घेतला जाईल.
प्रकाश आंबेडकर यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीतील घटकपक्ष नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित आघाडीने अकोल्यासह वर्धा आणि सांगलीसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
वर्ध्याच्या जिल्हा कार्यकारिणीने तिथल्या उमेदवाराची शिफारस केली आहे, मात्र अद्याप पक्षानं निर्णय घेतलेला नाही. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर ८ तारखेला अंतिम निर्णय होणार आहे. मात्र मविआच्या पुढच्या बैठकीचं निमंत्रण नाही. ६ मार्च रोजी शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या भेटीतही मविआसोबत काही जुळलं नाही तर पुढचं काहीच सांगू शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले.