लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच थांबण्याची चिन्हं आहेत. कारण, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ही माहिती दिली.
त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. जागावाटपावरून महाविकास आघाडीत गोंधळ आहे का असा प्रश्न विचारला त्यांना विचारला गेला. त्यावर, तसं काहीही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. अनौपचारिक पद्धतीनं त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. येत्या ८-१० दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
वंचित बहुजन आघाडीसाठी अद्याप इंडिया आघाडीचं दार उघडलेलं नाही, असं विधान नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबाचं मोठं काम आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या विकासासाठी त्यांची गरज आहे. नवीन पिढीला दिशा देण्याचं काम ते करतील. त्यांना इंडिया आघाडीत एक मोठी भूमिका मिळेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमवर विरोधी पक्षातील काही नेते वारंवार संशय व्यक्त करत आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. 'देशात सत्तेत कुणीही असो, त्यांनी घटनेच्या अधीन राहून आणि पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. ईव्हीएममध्ये घोळ आहे असं जर लोक म्हणत असतील तर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्याबाबत भूमिका मांडली पाहिजे. ते एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहे, याची आठवणही सुळे यांनी करून दिली.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 'फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यातील गुन्हेगारी दर वाढला आहे. तशी आकडेवारीच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.