Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा-lok sabha election 2024 foot massager machine selfie point facility for voters in solapur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

May 07, 2024 12:08 AM IST

Lok sabha Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन,
मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन,

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (७ मे) पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून वोटिंग मशीन संबंधित मतदान केंद्रात पोहचवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( ७मे २०२४) रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने आदर्श मतदान केंद्र केलेले आहे. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना  फूट मसाजरची सुविधा गोयेगाव ग्रामपंचायतने दिलेली आहे, अशी माहिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

गोयेगाव ग्रामपंचायतीने आदर्श मतदान केंद्राच्या बाहेर हे फूट मसाजर मतदारांसाठी ठेवलेले आहे. त्यामुळे येथे मतदान करण्यासाठी पायी चालून येणाऱ्या मतदारांना तसेच उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन डिहायड्रेशन झाल्यानंतर मतदारांना पायांचा त्रास झाल्यास तात्काळ पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर हे अद्यावत यंत्र येथे ठेवण्यात आलेले आहे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ही सुविधा मतदारासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी केलेला हा एक अनोखा उपक्रम असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केल्यानंतर खूप मसाजर मशिन च्या माध्यमातून पाय दाबून घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, एएमएफ चे नोडल अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती करमाळा व ग्राम पंचायत गोयेगाव यांनी मतदारांसाठी फूट मसाजर हा अनोखा उपक्रम केलेला आहे.

वस्तीवरून गावातून चालत येणाऱ्या मतदारांना डिहायड्रेशन चा होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत ORS आणि मेडिकल किट ठेवण्यात आले आहे. तसेच या मतदान केंद्रावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे. मतदारांना उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप टाकण्यात आला आहे. शाळेतील अमृत रसोई मध्ये फ्रीज उपलब्ध आहे तेथे थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहे. मतदारांना मतदानाच्या शिक्षणासाठी व्हरांड्यात टीव्ही लावण्यात आलेला आहे. या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

Whats_app_banner