Lok Sabha Elections 2024: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मताच्या फरकाने पराभव केला. याच पार्श्वभूमीवर एका सामान्य कार्यकर्त्याने अजित पवारांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण लकडे असे अजित पवारांना पत्र लिहिणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. किरण यांनी अजित पवारांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, अजित पवार भाजपसोबत गेल्याचा आणि त्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळल्याचा आनंद आहे. परंतु, आपल्या भोवती फिरणारे पुढारी सामान्य लोकांना कार्यकर्त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवू देत नाहीत. ज्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवड झाली, त्यांनी लोकांशी संपर्क तोडला. या पदांचा वापर ते जनतेसाठी नव्हेतर, स्वत:चे घर भरण्यासाठी करत आहेत, अशी तक्रार लकडे यांनी पत्राद्वारे केली.
पुढे पत्रात लिहिले आहे की, जनता त्यांच्याकडे समस्या घेऊन गेल्यास ते टाळाटाळ करतात. वेळप्रसंगी धमकीही देतात. तीच कामे तुमच्याकडे घेऊन आल्यास आडवे येतात. लोक घाबरून त्यांचे ऐकतात. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत या गोष्टी टाळायला पाहिजेत, असे किरण यांनी म्हटले आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचे मूळ कारण शोधण्याचेही आवाहन केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या चुलत भावाच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एक लाख ५८ हजार ३३३ मतांनी पराभव केला. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे २०२४ रोजी मतदान झाले. तर, ४ जून २०२४ निकाल जाहीर झाला. यावेळी ५९.५० टक्के मतदान झालेल्या बारामती मतदारसंघातून प्रभावी पवार कुटुंबातील दोन सदस्य पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात निवडणूक उभ्या होत्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवारच निवडून येतील, असा विश्वास अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. परंतु, जनतेने सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला.