मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Miraj Sangli : मिरजमध्ये मध्यरात्री चार हॉटेल जमीनदोस्त; पडळकरांविरोधात नागरिक आक्रमक

Miraj Sangli : मिरजमध्ये मध्यरात्री चार हॉटेल जमीनदोस्त; पडळकरांविरोधात नागरिक आक्रमक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 07, 2023 11:19 AM IST

hotels demolishing case in miraj : सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री चार हॉटेल्स जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

hotels demolishing in miraj sangli
hotels demolishing in miraj sangli (HT)

hotels demolishing in miraj sangli : मध्यरात्री जेसीबीनं चार हॉटेल्स पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये खळबळ उडाली असून आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनीच हे बांधकाम पाडल्याचा आरोप करत स्थानिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळं आता आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय हॉटेल्स पाडण्यात आल्याच्या घटनेमुळं मिरजेतील नागरिक पडळकरांविरोधात आक्रमक झाले असून त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील मिरजच्या बसस्थानकाजवळ असलेल्या चार हॉटेल्स मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्यात आल्या होत्या. याबाबतची माहिती समजताच सकाळी हॉटेलमालकांसह स्थानिक नागरिकांनी मिरजेतील हे बांधकाम भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकरांनी पाडल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केलं. पालकमंत्री सुरेश खाडे हे देखील या प्रकरणात सहभागी आहेत का?, जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या दीड ते दोन हजार गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मिरजेतील हॉटेलमालकांसह सामान्य नागरिकांनी केली आहे. याशिवाय आरोपींवर गुन्हे दाखल झाले नाही तर सुरेश खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पाडकाम कायदेशीरच- पडळकर

मिरजेतील ज्या हॉटेल्स पाडण्यात आल्या आहेत, त्यांचं पाडकाम हे कायदेशीर पद्धतीनंच करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर दुसरीकडे त्यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर याच्याविरोधात नागरिक आक्रमक झाले असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळं आता मिरजेतील वातावरण तापलेलं असतानाच पोलिसांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

WhatsApp channel