Mumbai Local Train News : ठाणे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक कोलमडली आहे. ऐन गर्दीच्या आणि गर्मीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
सिग्नल यंत्रणा सुरळीत चालत नसल्याचं सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आलं. या तांत्रिक बिघाडामुळं कल्याण ते कुर्ला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळं कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. काही लोकांनी रुळावरून पायपीट सुरू केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं रेल्वे गाड्या तिथंच थांबल्या. या मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनानं 'एक्स'वरून तासाभरापूर्वी या संदर्भातील माहिती दिली. वाहतूक सुरळीत करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असं प्रशासनानं स्पष्ट केलं. आता काही वेळापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं पुन्हा एकदा ट्वीट केलं असून वाहतूक सुरळीत झाल्याचं म्हटलं आहे. सर्व लोकल गाड्या आणि मेल एक्स्प्रेस नेहमीच्या वेळेनुसार धावत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मध्य रेल्वेच्या सेवाचा पसारा मोठा आहे. मध्य रेल्वेकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून ठाणे जिल्ह्यातील कल्याणपर्यंत आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीपर्यंत वाहतूक सेवा दिली जाते. याशिवाय, या मार्गावरून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत तसंच देशभरात एक्स्प्रेस गाड्या धावत असतात. आजच्या तांत्रिक बिघाडामुळं या सर्व सेवेवर परिणाम झाला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त होऊन वाहतूक सुरळीत झाल्याचं प्रशासनानं सांगितलं असलं तरी सर्व काही सुरळीत होण्यास आणखी बराच वेळ जाईल, असं समजतं.
लोकल ट्रेन ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची 'लाइफलाइन' समजली जाते. दररोज लाखो लोक पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेननं प्रवास करत असतात. अगदी दुपारच्या वेळेसही लोकल ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नसते. कार्यालयं सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत तर लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. अशा वेळी काही कारणामुळं वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आजही तेच झालं.