Mumbai local update: मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आधील लोकल ट्रेन उशिरा धावत असताना मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान असलेल्या ओव्हरहेड केबलवर बांबूचे शेड कोसळल्याने जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वायरवर कोसळलेले बाबू बाजूला केल्यानंतर गाड्या सुरू झाल्या, पण वेळापत्रक कोलमडल्यानं ऑफिसला निघालेल्यांची गैरसोय झाली. अनेकांनी ट्रॅकवरून पायी चालत ऑफिस गाठले.
लोकल सेवा ही मुंबईची लाईफलाइन समजले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व काही ना काही कारणांमुळे ही लोकल सेवा कोलमडत आहे. आज मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान झालेल्या एका बिघाडामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. या ठिकाणी आज सकाळी रेल्वेट्रॅक शेजारी असलेल्या एका सोसायटीत बांधन्यात आलेले बांबूचे शेड ओव्हरहेड केबल्सवर येऊन कोसळले. यामुळे या मार्गावरील विद्युत सेवा विस्कळीत झाली. अचानक झालेल्या बिघाडामुळे लोकल सेवा काही काळ खोळंबली होती. सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल माटुंग्याला खोळंबलेल्या होत्या. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. एवढंच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. वेळत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट सुरू केली.
या बिघाडाची माहिती मिळाल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने केबल्सवर कोसळलेले बांबूचे शेड बाजूला करत विद्युत प्रवाह सुरळीत केला. तब्बल ८.३० पर्यंत येथील जलद मार्गावरील सेवा ही प्रभावित झाली होती. यानंतर ती सुरळीत झाली.
ठाणे, मुंबई, कल्याण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रेल्वेट्रॅक वर पाणी साठले असून या मुळे लोकल ही धीम्या गतीने पुढे जात आहे. मुंबईला आज हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्या पूर्वी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच बाहेर पडा किंवा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.