Live News Updates 29 March 2023 : खा. गिरीश बापट अनंतात विलीन, पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला निरोप
Girish bapat funeral : पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Wed, 29 Mar 202317:22 IST
महावितरण कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, एकावर गुन्हा दाखल
वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास थकबाकीदार ग्राहकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर ई सेक्टरमधील रहिवासी असलेल्या शेख अफसर शेख गफूर पटेल या ग्राहकाकडे वीजबिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मंगळवारी दुपारी महावितरणचे पथक गेले होते. त्यावेळी आरोपीने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ महेश मुळेकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
Wed, 29 Mar 202314:59 IST
खा. गिरीश बापट अनंतात विलीन, पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला निरोप
पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. याबरोबरच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wed, 29 Mar 202313:47 IST
Girish Bapat Funeral : गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; कार्यकर्त्यांसह सामान्यांची मोठी गर्दी
Girish Bapat Passed Away : भाजपा नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज दुपारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यानंतर आता त्यांची अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेनं निघाली आहे. अंत्ययात्रेला सामान्य पुणेकरांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे.
Wed, 29 Mar 202313:23 IST
Uddhav Thackeray on Girish Bapat : उद्धव ठाकरे यांनी वाहिली गिरीश बापट यांना श्रद्धांजली
Uddhav Thackeray on Girish Bapat : गिरीश बापट गेले. राजकारणातल्या जुन्या वळणाचा उत्तम माणूस म्हणुन त्यांची ओळख होती. शिवसेना भाजपा युती असताना ज्यांनी सतत युती टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न केले असे बापट होते. सगळ्यांना एकत्र ठेवणारा दिलदार नेता अशी त्यांची किर्ती होती. गिरीश बापट आणि पुणे असे एक समीकरण बनले होते. शिवसेनेशी त्यांचा विशेष स्नेह होता. अनेकदा खुलेपणाने ते मातोश्रीवर येत-जात होते. महाराष्ट्राच्या राजकाणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा गिरीश बापट यांच्यासारखा नेता आपल्याला सोडून गेला. आई जगदंबा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Wed, 29 Mar 202311:52 IST
Philips : नवीन फिलिप्स स्मार्ट वायफाय एलईडी डाउनलाइटर भारतात लाँच
नावीन्यपूर्ण वारसा उभारून, प्रकाशात जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्निफायने नवीन स्मार्ट एलईडी डाउनलाइटर लॉन्च करून फिलिप्स स्मार्ट वायफाय श्रेणीचा विस्तार केला आहे. नवीन डाउनलाइटर आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहे आणि दोन उत्कृष्ट रंग पर्यायांमध्ये - ब्लॅक-रोझ गोल्ड आणि व्हाईट-सिल्व्हर, तुमच्या घराच्या आतील भागात एक सुंदर स्पर्श जोडण्यासाठी. त्याची प्रीमियम हाऊसिंग आणि डीप रिसेस्ड डिझाइन कमी चकाकी आणि सुलभ स्थापना देते, तर त्याचे किमान ट्रिम डिझाइन उच्चारण प्रकाशासाठी चमकदार आणि केंद्रित ३६-डिग्री लाइट बीम देते.
Wed, 29 Mar 202311:49 IST
body Shop : द बॉडी शॉपची नवीन अॅक्टिव्हिस्ट मेकअप श्रेणी
द बॉडी शॉप या ब्रिटनमध्ये स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने त्यांच्या नवीन अॅक्टिव्हिस्ट मेकअप श्रेणीच्या लाँचची घोषणा केली आहे. या श्रेणीमध्ये प्रिमिअम, नैतिकदृष्ट्या स्रोत मिळवलेल्या घटकांचे मुख्य तत्त्व असलेल्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. या घटकांपैकी ९५ टक्के घटक मूलत: नैसर्गिक आहेत.
Wed, 29 Mar 202311:44 IST
Tork Motors : टॉर्क मोटर्स पुणे डीलरशिपने वितरित केल्या ५० मोटारसायकल्स
इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादक टॉर्क मोटर्सने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ५० टॉर्क क्राटोस आर मोटरसायकली वितरित केल्या. पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील टॉर्क मोटर्सच्या डीलरशिपमधून यशस्वीरित्या हे वितरण झाले. याबद्दल बोलताना टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, "या शुभ दिवशी, ई-मोटारसायकल प्रेमींना त्यांच्या टॉर्क क्राटोस आर च्या किल्ल्या देऊन त्यांच्या उत्सवात रंग भरताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला मिळणा-या प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि टॉर्क मोटर्सच्या कुटुंबात अधिकाधिक रायडर्स जोडण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो."
Wed, 29 Mar 202311:43 IST
Closing bells : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची जोरदार खऱेदी, निर्देशांक वधारला
आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी दिसून आली. परिणामी, दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४६ अंकांच्या तेजीसह ५७,९६० अंशांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२९ अंशांच्या तेजीसह १७,०८० अंशांवर स्थिरावला. आँईल अँड गॅस वगळता सर्वच क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला.
दरम्यान, उद्या रामनवमी असल्याने शेअर बाजाराला सुट्टी आहे. त्यामुळे उद्या कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
Wed, 29 Mar 202312:03 IST
अमरावतीमध्ये देखील उभे राहणार पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क
अहमदाबाद: अलीकडेच भारत सरकारने भारतातील सात राज्यांमध्ये पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्कची घोषणा केली. या टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेसह, सरकार वस्त्रोद्योग मूल्य साखळी एका परिसंस्थेमध्ये सुव्यवस्थित आणण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही अशी राज्ये आहेत जिथे 4,445 कोटी रुपयांच्या पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपेरल (PM MITRA) योजनेअंतर्गत मेगा-पार्कची घोषणा केली जाणार आहे. ``या टेक्सटाईल पार्क्समुळे परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील,'' असे मत विशाल फॅब्रिक्स लिमिटेडचे सीईओ श्री विनय थडानी यांनी व्यक्त केले.
Wed, 29 Mar 20239:59 IST
Sharad Pawar : गिरीश बापट यांच्या अंत्यविधीसाठी शरद पवार पुण्याला जाणार; राष्ट्रवादीचा मुंबईतील कार्यक्रम रद्द
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार असल्यानं चेंबूर इथं आज सायंकाळी पाच वाजता होणारा 'युवा मंथन, वेध भविष्याचा' हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही माहिती दिली आहे.
Wed, 29 Mar 20237:51 IST
Ajit Pawar on Girish Bapat Death : पुणे जिल्ह्यानं सर्वसमावेशक नेतृत्व गमावलं; अजित पवार यांची गिरीश बापट यांना श्रद्धांजली
Ajit Pawar on Girish Bapat Death : गिरीश बापट यांचं निधन हा पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून त्यांनी समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रिय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Wed, 29 Mar 20236:22 IST
China Loan Strategy : चीनच्या कर्जाखाली दबले जगातले २२ देश, तब्बल २४० अब्ज डॉलरचा बोजा
चीनने पाकिस्तान, श्रीलंकेसह एकूण २२ विकसनशील देशांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केलं आहे. हे देश कर्जाची परतफेड करू शकत नसल्यामुळं त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं आहे. एका अहवालानुसार, चीननं गेल्या दोन दशकांत या देशांना २४० अब्ज डॉलरचं कर्ज दिलं आहे. यातील बहुतांश कर्जे चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा भाग असलेल्या देशांना देण्यात आली आहेत. यात श्रीलंका, पाकिस्तान आणि तुर्की यांचा समावेश आहे.
Wed, 29 Mar 20236:23 IST
Jalna Society Election : जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भाजपला धक्का
Jalna: जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील कडेगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक पार पडली.
Wed, 29 Mar 20234:37 IST
opening bell : सेन्सेक्सची वाढ चांगली, लक्ष अदानी स्टाॅक्सवर
जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स निफ्टीची सुरवात आज चांगली झाली आहे. सेन्सेक्स सध्या १७४.४० अंशांची वाढ नोंदवत ५७,७८८.१२ अंशांवर ट्रेड करत आहे. निफ्टीमध्ये ५९ अंशांची वाढ नोंदवत तो १७,०११.४५ अंशांवर ट्रेड करत आहे.
Wed, 29 Mar 20234:07 IST
Pune : पुणे जिल्ह्यात ४ हजार १३० कोटी कर्जवाटपाद्वारे मोडला गतवर्षीचा उच्चांक
पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग दुसऱ्या वर्षी उच्चांक गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सन २०२२-२३ मध्ये आजअखेर एकूण ४ हजार १३० कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेत सर्व बँकांशी संपर्क साधत कर्जवाटपातील अडथळे दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे ही विक्रमी कामगिरी शक्य झाली आहे.
Wed, 29 Mar 20234:06 IST
Pune : तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची- निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे
तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढते कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सभेमध्ये केले. तंबाखू विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ श्री. खराडे यांच्या हस्ते कोटपा २००३ कायद्याच्या फलकाचे अनावरण करुन करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. सारीका खाडे, मानसशास्त्रज्ञ हनुमान हाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, दंत शल्यचिकित्सक डॉ. विद्या कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी भोसले आदी उपस्थित होते.
Wed, 29 Mar 20231:37 IST
Pune : पिंपरी महापालिकेचे पोलिसांकडे साडेपाच कोटींचे भाडे थकीत
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडेपाच कोटी रुपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे.
Wed, 29 Mar 20231:36 IST
Pune : भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास केशव पाटोळे (वय ६५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कैलास पाटोळे (वय ५८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Wed, 29 Mar 20231:34 IST
Prasad Purandare : थिएटर ॲकॅडमीच्या अध्यक्षपदी प्रसाद पुरंदरे यांची फेरनिवड
थिएटर ॲकॅडमी’च्या अध्यक्षपदी प्रसाद पुरंदरे यांची आगामी तीन वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिन आणि संस्थेचा सुवर्णमहोत्सव पूर्ती वर्धापनदिन असे दुहेरी औचित्य साधून महाराष्ट्रीय मंडळ आणि थिएटर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या सकल ललित कलाघर येथे झालेल्या ‘थिएटर ॲकॅडमी‘च्या वार्षिक सर्वसधारण सभेमध्ये संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
Wed, 29 Mar 20231:32 IST
Pune : भाडेकरूच्या विरोधात वृद्ध दाम्पत्याचे उपोषण
गेल्या साडेतीन वर्षांपासून भाडे न देता राहत्या घरावर बेकायदेशीर ताबा घेऊन शाळा चालवणाऱ्या भाडेकरूविरोधात डॉ. अविनाश फाटक व माधुरी फाटक या वृद्ध दाम्पत्यासह अन्य ८-१० सिनिअर सिटीझन न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी ८ वाजता सरस्वती बंगला, सदानंद सोसायटी, स्वामी विवेकानंद पुतळ्यामागे, पद्मावती येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
Wed, 29 Mar 20231:30 IST
Kumar Saptarshi : 'मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान' डॉ.कुमार सप्तर्षी यांना जाहीर
नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान ' ज्येष्ठ लेखक , विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाकरीता असलेल्या 'प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारा'साठी पोपट श्रीराम काळे यांच्या 'काजवा' या आत्मकथनाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रुपये ११ हजार रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
Wed, 29 Mar 20234:12 IST
Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वात आज व्हेरायटी चौक येथील गांधी चौक ते संविधान चौक दरम्यान काँग्रेस पक्षाचा लॉंग मार्च निघणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व ज्या पद्धतीने रद्द करण्यात आले त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
Wed, 29 Mar 20231:25 IST
Mumbai : एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
Wed, 29 Mar 20231:24 IST
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील चेंबुरमध्ये सायंकाळी जाहीर सभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील चेंबुरमध्ये सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्यावतीने चेंबूरमध्ये युवा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित तरुणांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
Wed, 29 Mar 20231:23 IST
Pune : सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात आज पोलीस तक्रार करणार
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात आज पोलीस तक्रार करण्याची शक्यता आहे.
Wed, 29 Mar 20231:23 IST
shirdi : आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सव
आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला होणार प्रारंभ होणार आहे. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.
Wed, 29 Mar 20231:22 IST
Chandrapur : राममंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या सागवनाचे आज बल्लारपूर येथे काष्टपूजन
अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या सागवनाचे आज बल्लारपूर येथे काष्टपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शोभायात्रेच्या स्वरूपात सागवानाची लाकडे चंद्रपुरात आणली जाणार.
Wed, 29 Mar 20231:21 IST
Palghar : पालघरमधील २ साधू हत्या प्रकरण सीबीआयला देण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
पालघरमधील २ साधू आणि ड्रायव्हर हत्याप्रकरणाची चौकशी CBI ला देण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Wed, 29 Mar 20231:20 IST
Delhi News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सकाळी प्रकरण होणार मेन्शन
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सकाळी प्रकरण मेन्शन केलं जाण्याची शक्यता. त्यानंतर सुनावणीची नवी तारीख निश्चित होईल. 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही
Wed, 29 Mar 20231:19 IST
Pune : पुणे जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा जाहीर, गेल्यावर्षापेक्षा २६ टक्क्यांनी वाढ
पुणे जिल्ह्याचा सन २०२३-२४ साठी १ लाख ४७ हजार ८०० कोटी रुपयांचा वार्षिक पत पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये पीक कर्ज, कृषी मुदत कर्जासह कृषी क्षेत्रासाठी सुमारे ९ हजार ७५० कोटी रुपयांची तर सूक्ष, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सुमारे २९ हजार ६९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पत आराखडा सुमारे २६ टक्क्यांनी जास्त आहे.
Wed, 29 Mar 20231:19 IST
Rahul Gandhi: काँग्रेसचे देशभरात आजपासून जय भारत सत्याग्रह
राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि देशाची लूट थांबवण्यासाठी मोदी अदानी हितसंबंधांबाबत निर्भीडपणे प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेसचा जय भारत सत्याग्रह आजपासून सुरू होणार आहे. ८ एप्रिल पर्यंत देशभरात काँग्रेस वेगवेगळे आंदोलन करणार आहे.