Mumbai dry day 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. येत्या सोमवारी (२० मे) पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे व कल्याण मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, येथील दारूची दुकाने बंद राहणार आहेत. आचारसंहितेनुसार ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे तसेच त्या मतदारसंघाच्या नजीकच्या मतदारसंघात ‘ड्राय डे’ घोषित केला जातो. यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी शनिवारी १८ मे ते सोमवारी २० मे असे तीन दिवस (Three days dry day ) दारुची दुकाने बंद राहणार आहेत.
तीन दिवस ड्राय डे असल्याने दारू मिळवणे व घसा ओला करणे मद्यप्रेमींसाठी मोठे आव्हान असणार आहे. यामुळे त्यांना आधीच याची तजवीज करावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी २० मे रोजी मुंबईसह पालघर, कल्याण, ठाणे आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारपर्यंत सर्व वाईन शॉप व बार बंद राहणार आहेत. मतदानानिमित्त प्रशासनाकडून १८ ते २० मे दरम्यान या मतदारसंघांमध्ये ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.
निवडणूक प्रचार थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याचा घटना समोर आल्या आहेत. ‘ड्राय डे’ काळात छुप्या पद्धतीने मद्य साठा करणे, मद्याचा काळा बाजार करणे, बाहेरच्या राज्यातून तस्करी करणे, चढ्या भावाने चोरून दारू विक्री करणे, बनावट दारू आदि प्रकार समोर येत असतात. तसेच मतदारांना दारूचे आमिष दाखवणे, त्यांच्यासाठी दारू पार्ट्या आयोजित करणे सुरू असते. याला प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांसह उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी केली जात असून अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे.
कधीपासून ड्राय डे सुरू
मुंबई शहर व उपनगरात शनिवारी १८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून वाईन शॉप व बीअर बार बंद राहणार आहेत. त्यानंतर, १९ मे रोजी पूर्ण दिवस बंद राहतील आणि २० मे रोजी संध्याकाळी ६ नंतर उघडतील. त्याचबरोबर ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी मुंबईत पुन्हा ‘ड्राय डे’ असणार आहे.