विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ८० निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत राज्य सरकारने ओबीसींसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पादनाची मर्यादा आठ लाखांवरून आता १५ लाख करण्यात आली आहे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नॉन क्रिमीलेअरची मर्यादा वाढली तर ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महायुती सरकारची ही शेवटचीच कॅबिनेट बैठक ठरू शकते. कारण पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागू शकते. या बैठकीमध्ये तब्बल ८० निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नॉन क्रिमीलेअरची मर्यादा वाढवून १५ लाख करण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्पन्नाची मर्यादा ठरवताना शेतीमधून मिळणारे उत्पन्न ग्राह्य धरु नये, अशीही राज्य सरकारची भूमिका आहे, तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
वार्षिक उत्पन्न वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करत हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. लोकांचे जीवनमान आणि वेतनस्तर उंचावल्यामुळे अनेक समाजातील लोकांना शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी असणारी आठ लाखांची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होते.
नॉन क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाख केल्यानंतर ओबीसी, मराठा आणि इतर समाजातील आरक्षणाचा लाभ घेणार्या नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही होऊ शकतो.
मागासवर्गीय नागरिकांना (अनुसूचित जाती, जमाती वगळून) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’ बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रामुळे उन्नत व प्रगत मागासवर्गीय नागरिकाला आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. नोकरी व शेतीचे उत्पन्न सोडून अन्य मार्गाने होणारे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा अधिक असेल, तर या व्यक्ती क्रिमिलेअरमध्ये मोडतात. हे प्रमाणपत्र पूर्वी मागासवर्गीय विद्यार्थ्यांला दरवर्षी काढावे लागत असे. मात्र आता दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागते.
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्कॉलरशिप आणि परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी एकच समान धोरण निश्चित करण्यात आलं आहे. नव्या नियमांनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे
संबंधित बातम्या