मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-नागपूर समृद्धी हायवेच्या कामाबद्दल राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई-नागपूर समृद्धी हायवेच्या कामाबद्दल राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार

HT Marathi Desk HT Marathi
Jan 16, 2024 09:14 PM IST

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना ‘विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार
राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना ‘विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या वेगवान कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह येथे विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनतर्फे ‘मुंबई शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली होती. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, हिंदुजा उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्मा, विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील 'मुंबई सस्टेनेबिलिटी' पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रशासकीय अध‍िकारी राधेश्याम मोपलवार यांना 'मुंबई शाश्वत विकास जीवन गौरव' पुरस्कार देण्यात आला. मोपलवार हे मागील अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. सोबतच त्यांच्याकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या वॉर रूमचीही जबाबदारी देण्यात आली होती. मोपलवार यांनी त्यांच्या कार्यकाळात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला. याप्रसंगी मोपलवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत साथ देणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतर मंत्री तसेच सहकारी या सर्वांचे आभार मानले. 

या कार्यक्रमात डॉ. दिवेश मिश्रा (पर्यावरण), अनुराधा पाल (स्त्री शक्ती महिला शास्त्रीय वाद्यवृंद), डॉ. हरिष शेटटी (आहार वेद), अमृत देशमुख (स्वयं वाचन चळवळ) , सुजाता रायकर (साथ), लॉरेन्स बिंग (हॉकी), डॉ चिनु क्वात्रा (खुश‍िया फाऊंडेशन) यांना देखील राज्यपालांच्या हस्ते 'मुंबई सस्टेनेबिलिटी' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

WhatsApp channel