समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे स्थित सीबीआयच्या विशेष कोर्टाने आज सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाने या प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. पुनळेकर हे या प्रकरणात जामिनावर सोडण्यात आले होते.
दरम्यान, दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. मात्र न्यायालयाने ज्या आरोपींना निर्दोष सोडलं आहे त्याविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
विज्ञानवादी विचारधारा मानणारे ज्येष्ठ समाजसुधारक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी ७ः३० वाजता मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते संस्थापक होते. दाभोलकर खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात आला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे. ‘डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर आम्ही न्यायव्यवस्थेवर सातत्याने विश्वास ठेवत आलो आहोत. आज प्रत्यक्ष जे दोन मारेकरी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. याप्रकरणी इतर जे तीन आरोपी सुटलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ. अशाप्रकारे नरेंद्र दाभोलकर यांचे विचार संपवता येत नाही. उलट मोठ्या निर्धाराने त्यांचं काम सुरूच आहे. ज्या विचारधारेवर दाभोलकर यांचा खून करण्याचा संशय होता त्यावर आजच्या न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुळात या खुनाच्या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक झालेली नाही. बाकीचे जे सूत्राधार होते त्यांची आज सुटका झालेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाणार आहेत.’ असं हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
दरम्यान, २०१३ साली दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी अतिशय संथगतीने तपास केला जात असल्याचा आरोप दाभोलकर यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला होता. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. कर्नाटकात गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱे आरोपींना अटक करण्यात आली होती.