boy dead in leopard attack in Pune Shirur : पुणे जिल्ह्यात बिबट आणि मानव संघर्ष वाढला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्तीमधे शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले आहे. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावात रोष व्यक्त केला जात आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
शिवतेज समाधान टेंभेकर (वय ४) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज हा शुक्रवारी त्याचा घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला शेजारील शेतात उचलून नेले. त्याच्या आवाजाने घरातील लोक आणि आजुबाजुचे शेजारी बीबट्याच्या मागे धावले. पण तो पर्यंत या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ही घटना घडल्यानंतर वनविभगाचे अधिकारी बराच वेळ घटनास्थळी दाखल न झाल्याने स्थानिकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात १९ ऑक्टोबरला इथुन जवळच असलेल्या गोकुळनगर परिसरात वंश शिंग या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे. वन विभागाला एक महिन्यात १४ पिंजऱ्यात एक बिबट्या देखील सापडला नाही त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.
गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात ८ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत देखील बिबट्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय.
पुण्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. ऊसाच्या शेतीमुळे बिबट्याला लपण्यास चांगली जागा मिळते. यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्याची पैदास पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड तालुक्यात वाढली आहे. या सोबतच भटकी कुत्री, कोंबड्या, पशू, पक्षी हे खाद्य देखील त्यांना सहज मिळत असल्याने बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करू लागला आहे.