मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कात्रज प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

कात्रज प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 05, 2024 08:49 PM IST

rajiv Gandhi zoological museum katraj : प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून एका बिबट्याने धूम ठोकल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कात्रज प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम
कात्रज प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम

पुण्याजवळील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून एका बिबट्याने धूम ठोकल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून हा बिबट्या अचानक गायब झाला आहे. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तो सीसीटीव्हीत दिसला होता. त्याची शोधमोहीम सुरू असून अजून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

अग्निशामक दलासह पुणे, नाशिकची रेस्क्यू टीम, ५० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र गेल्या जवळपास ४० तासापासून बिबट्या मोकाट असून त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही.

कात्रज प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीच्या बिबट्याने पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून धूम ठोकली आहे. हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून कात्रज येथे आणण्यात आला होता. बिबट्या पळाल्याने प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूच्या वाड्या-वस्त्या आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

सोमवारी पहाटेपासून बिबट्या कोणालाही दिसलेला नाही. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ मानवी वस्ती व रहिवासी सोसायट्या आहेत. यामुळे येथील नागरिकांत खळबळ माजली आहे. बिबट्याचा शोध लागलेला नसल्याने संग्रहालय प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. वनविभाग आणि सुरक्षा अधिकारी अविरतपणे बिबट्याचा शोध घेत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग