एका १२ वर्षाच्या मुलाने प्रसंगावधान राखत एका बिबट्याला जेरबंद केल्याचं तसेच कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्याचे गज वाकवून एक बिबट्या पसार झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी येथे शिकारीच्या शोधात बिबट्या गायीच्या गोठ्यात शिरला. मात्र घडलं भलतंच गोट्यात शिरलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. जीव वाचवण्यासाठी गायीच्या दावणीत त्यांच्या पायीपाशी निपचित पडलेल्या या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले.
गोठ्यात बांधलेल्या दोन गायी पाहून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बांधलेल्या अजूनही दोन्ही गायींनी रौद्ररूप दाखवत बिबट्याचा प्रतिकार केला व बिबट्याला लाथा मारून जखमी केले. गोट्यात अंधार असल्याने बिबट्या गायींना बांधण्याचा खुंटा आणि भिंतीच्या मधोमध पडून राहिला.
सिन्नर तालुक्यातील दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड यांच्या जनावराच्या गोठ्यात तीन दिवसापूर्वी बिबट्या शिरला होता. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरू आव्हाड गोठ्याची स्वच्छता करण्यास गेले असता त्याना गायीच्या पायाजवळ बिबट्या निपचिप पडल्याचे दिसले. आव्हाड यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीम आणि वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याला गायीने तुडवल्यामुळे बिबट्या भीतीने निपचिप पडलेला होता. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने ट्रॅन्क्युलायझर गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध केले व त्याला ताब्यात घेतले. जखमी बिबट्यावर मोहदरी येथील वनोद्यानात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.