पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

Published Feb 02, 2025 01:05 PM IST

Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यातील निगडी प्राधिकरणात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून एका बिबट्याला जेरबंद केलं आहे.

पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश
पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ऐरवी जंगलात राहणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. आज सकाळी निगडी प्राधिकारणातील संत कबीर उद्यान व दुर्गा टेकडी परिसरात बिबट्या आढळून आला होता. येथील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला होता. ही बाब बंगल्याच्या केअर टेकरच्या लक्षात आल्याने त्याने ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आलं. तब्बल २ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशीत आहेत.

निगडी प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. या ठिकाणी संत कबीर उद्यान आणि दुर्गा टेकडी परिसर आहे. येथे सकाळी नागरिक फिरण्यासाठी येत असतात. तर अनेक तरुण आणि तरुणी या उद्यानात येत असतात. आज सकाळी या परिसरात असलेल्या एका बंगल्यात बिबट्या आढळून आला. बंगल्याच्या केअर टेकरला हा बिबट्या दिसला. यानंतर बिबट्या हा संत कबीर उद्यानात जाऊन हा बिबट्या लपला. उद्यानातील खोलीत हा बिबट्या अडकला होता. ही माहिती वनविभगाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बावधन येथील वनविभागाचे रेस्क्यू पथक हे संत कबीर उद्यान परिसरात दाखल झाले.  

सकाळी ९:१५ वाजता ही मोहीम रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली.  सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार  यांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने रेस्क्यू  चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्ष नेहा पंचमिया यांना ही माहिती दिली. त्यांनी रेस्क्यू  टीमला त्वरित घटनास्थळी पाठवले. ९:४५ वाजता नेहा पंचमिया आणि नचिकेत उत्पात यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून  बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बिबट्या सुरुवातीला सार्वजनिक उद्यानात दिसला होता, पण त्यानंतर एक बंद घराच्या आवारात त्याने प्रवेश केला, जिथे फक्त घराच्या केअर टेकरने त्याला पाहिले.  

 बिबट्या त्या घराच्या मागील भागात एका टिनच्या शेडच्या मागे लपला होता.  पुणे वन विभाग,रेस्क्यू टीम आणि पोलीसांनी अत्यंत काळजीपूर्वक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र,  बिबट्या सार्वजनिक उद्यानात पळाला.  पोलीस आणि अग्निशमन दलाने संपूर्ण भाग सुरक्षित केला.  बिबट्या एका खोलीच्या बाहेर लपला होता जिथे घरात एक महिला आणि दोन युवक होते. पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर यांनी सुरक्षितपणे बिबट्याला ट्रँक्विलाइझ (बेशुद्ध) केले. औषधाचा परिणाम होताच, बिबट्याला काळजीपूर्वक बाहेर काढून रेस्क्यू ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले. बिबट्या निरोगी नर असल्याचे आढळून आले असून, त्याच्यावर  बावधन येथील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्रात उपचार करण्यात येत असल्याचे नेहा पंचमिया यांनी सांगितले.

पाच ते सात वर्षांचा मोठा बिबट्या

या बिबट्याची पूर्ण वाढ झाली आहे. हा बिबट्या दुर्गा टेकडीच्या आवारातून आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला बावधन रेस्क्यू केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्याच्या वेशीवर बिबट्या

पुण्याच्या ग्रामीण भागात दिसणारा बिबट्या आता शहरात दाखल झाला आहे. सिहगड परिसर, बावधन, वाघोली आदी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. या बिबट्याच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबटे

पुण्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबटे आहेत. येथे मानव बिबट्या संघर्ष तीव्र झाला आहे. बिबट्यांचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. तर प्राण्यांवार देखील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा गाजला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर