
Rajapur Police Station News : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्यात घुसून एका बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुधवार, २४ जानेवारी रोजी ही घटना घडली. पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. काही भटक्या कुत्र्यांच्या मागे एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. बिबट्याच्या भीतीनं पोलीस ठाण्यात घुसलेले कुत्रे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेले. त्यांच्या मागोमाग बिबट्या घुसला आणि पहिल्या खोलीत गेला. तिथं त्यानं एका कुत्र्याची मानगूट पकडली आणि त्याला घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारातील पाण्याच्या टाकीच्या दिशेनं गेला.
बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं पाहून आधी तिथले कर्मचारीही भयभीत झाले. असं काही होईल अशी अपेक्षाही त्यांनी कधी केली नसेल. त्यांनी लगेच सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. बिबट्यानं इतर कुणावरही हल्ला केला नाही. कुत्र्याला घेऊन तो बाहेर पडल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्याच्या भीतीनं चार ते पाच कुत्रे पोलीस ठाण्यात घुसले होते. मात्र बिबट्या एकाच कुत्र्याला घेऊन गेला. त्यामुळं बाकीचे कुत्रे वाचले. त्यांनी लगेचच तिथून धूम ठोकली. या घटनेमुळं जंगली प्राण्यापासून असलेला धोका ऐरणीवर आला आहे.
संबंधित बातम्या
