मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard in Kalyan : १२ तासांच्या थरारानंतर कल्याणमधील बिबट्या जेरबंद; चारजण जखमी
कल्याणमधील बिबट्या जेरबंद
कल्याणमधील बिबट्या जेरबंद

Leopard in Kalyan : १२ तासांच्या थरारानंतर कल्याणमधील बिबट्या जेरबंद; चारजण जखमी

24 November 2022, 21:21 ISTShrikant Ashok Londhe

Leopard In Kalyan : आज सकाळी कल्याणमधील एका संकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभाग व प्राणीमित्र संघटनांना तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वनसेवकासह तीन नागरिक जखमी झाले आहेत.

Leopard caught in kalyan : कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका संकुलात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. १२ तासाच्या प्रयत्नानंतरवन विभाग, प्राणी मित्र संघटनांना बिबट्याला पकडण्यात यश आले. सकाळपासून या बिबट्याने तीन नागरिक आणि एका वनसेवकाला जखमी केले आहे. बिबट्याला भुलीचे तीन इंजेक्शन देऊन त्याला पकडण्यात आले. दरम्यान, या बिबट्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कल्याण शहरातील चिंचपाडा परिसरातील नागरी वस्तीत आज सकाळी बिबट्या शिरला होता. यावेळी बिबट्याला पाहून लोकांनी आरडाओरड केली. परंतु त्यानंतर बिबट्या श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीच्या थेट दुसऱ्या मजल्यावर घुसला. त्यानंतर बिबट्या तिथंच अडकून पडला. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरलझाले आहेत.

बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सायंकाळपर्यंत यश आले नव्हते. स्थानिक नागरिक, पोलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. इमारतीचा चिंचोळा भाग आणि घटनास्थळी लोकांची झालेली गर्दी यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. बिबट्या इमारतीच्या आवारातच लपून बसल्याने इमारतीतील रहिवासी सकाळपासूनच दार बंद करून घरातच बसले होते. विभागीय वन अधिकारी संजय चन्ने आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, पॉज, वॉर, सेवा, वफ या प्राणी मित्र संस्था,पोलीस यांनी श्रीराम अनुग्रह सोसायटीसह परिसराला वेढा घातला. जखमी रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीतून शिडीवरुन खाली उतरविले.

दरम्यान, बिबट्याला जेरबंद करताना एक वनसेवकही जखमी झाला. स्थानिक वनाधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करणे शक्य नसल्याने बोरीवली येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला दुपारी पाचारण करण्यात आले. या पथकातील नेमबाजांनी बिबट्यावर भुलीची इंजेक्शन सोडली. दोन इंजेक्शनच्यावेळी गुरगुरणारा बिबट्या तिसऱ्या इंजेक्शन मध्ये बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ जाळ्यात पकडून वैद्यकीय उपचारासाठी संजय गांधी उद्यानात नेण्यात आले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांच्या भागांमध्ये बिबट्या मानवी वस्तीत घुसत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आरे कॉलनीत बिबट्या घुसल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता कल्याणमध्येही भरदिवसा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला.

 

विभाग