बेळगाव येथील 'लोकमान्य ग्रंथालय' आणि 'बुक लव्हर्स क्लब' यांच्या विद्यमाने नुकतेच मुंबईस्थित पर्यटनतज्ज्ञ आणि 'डिव्हाईन इजिटेटर्स टिळक अँड हार्डी' या पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे एक विचारमंथनच होते. यावेळी तासगावकर यांनी पुस्तकात तत्कालीन भारतातील, ब्रिटनधील आणि एकूण जगातील परिस्थितीचे विश्लेषण केले आहे.
पुस्तकाचे अनेक पैलू त्यांनी आपल्या भाषणामध्ये उलगडून सांगितले. टिळक उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते. त्याचप्रमाणे टिळकांची दूरदृष्टी आश्चर्यजनक होती. लोकमान्य टिळकांनी १९१८ साली ब्रिटिश सरकारला २००० पौंडांची देणगी दिली होती. त्या देगणीचा कसा विनियोग झाला आणि भारताचे स्वातंत्र्य लवकर मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी काय प्रयत्न केले हेही त्यांनी आवर्जून सांगितले. सुरुवातीला जोगळेकर यांनी पुस्तकाचे सखोल विश्लेषण केले.
संस्थेचे किशोर काकडे यांनी तासगावकर यांचा परिचय करून दिला. भाषणानंतर पुस्तकासंबंधी प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तरादरम्यान या अज्ञात प्रकरणाची माहिती घेतली. त्याविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. परंतु या पुस्तकात १९१८ सालच्या ब्रिटिश लेबर पार्टीने टिळकांना दिलेल्या रिसीटचाही फोटो छापण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात पर्यटनविषययक बरीच प्रश्नोत्तरेही झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभली. उपस्थित प्रेक्षकांनी व्याख्यानाचा परिपूर्ण आनंद घेतला.
याच दिवशी सकाळी बेळगाव येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च' यामध्ये तासगावकर यांचे 'टूरिझम मॅनेजमेंट' या विषयावर सखोल व्याख्यान झाले. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांविषयीही उचित मार्गदर्शन केले. व्याख्यानाला बरीच विद्यार्थीमंडळी उपस्थित होती. प्रा. गौतमी मांगूर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरीफ शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘महिला दिनानिमित्त’ शीला तासगावकर यांचे 'वर्तमानातून वेध भविष्याचा' या विषयावर 'लोकमान्य ग्रंथालय' येथे स्लाईडसकट व्याख्यान झाले. लोकांनी स्लाईड आणि व्याख्यान हे दोन्हीही अतिशय उत्सुकतापूर्ण पद्धतीने पाहिले. व्याख्यानानंतर शीला तासगावकर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची त्यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली. लोकांना या विषयाबद्दल बरीच आस्था असल्याचे दिसून आले. सुरुवातीला विजया देशपांडे यांनी शीला तासगावकर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाची संपूर्ण आखणी व व्यवस्था 'लोकमान्य ग्रंथालया'चे कार्यवाह जगदीश कुंटे यांनी केली.
संबंधित बातम्या