Ambadas Danve suspended : विधान परिषदेतील चर्चेदरम्यान सत्ताधारी बाकांवरील सदस्यांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सभागृहातून ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे.
राहुल गांधी यांनी १ जुलै रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्य विधान परिषदेत उमटले होते. राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव संमत करावा, अशी मागणी भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्याला प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला. हा ठराव संमत करून लोकसभेला पाठवाव व राहुल गांधी यांना इटालीला पाठवावं, असं लाड म्हणाले. राहुल यांच्यावर टीका करताना लाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.
लाड यांच्या टीकेमुळं संतप्त झालेल्या अंबादास दानवे यांनी लाड यांच्या विषयी अपशब्द वापरले. तसंच, बोट दाखवल्यास ते तोडण्याची हिंमत माझ्यात आहे, असं ते म्हणाले. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या देऊन दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली. सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सत्ताधाऱ्यांच्या आग्रहामुळं सभापती नीलम गोऱ्हे यांनी गटनेत्यांची बैठक घेतली. मात्र, आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं दानवे म्हणाले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
'१ जुलै रोजी सभागृहात चर्चा करताना सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांच्या प्रती आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य भाषा वापरून अंबादास दानवे यांनी सभागृहाचा अपमान केला व संसदीय परंपरा मोडली. सभागृहाची प्रतिमा मलिन केली. त्यांच्या या बेशिस्त वर्तनाकडं दुर्लक्ष केल्यास भविष्यात चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळं त्यांना या अधिवेशन काळात पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत आहे. निलंबन काळात त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्यास बंदी असेल, असं ठरावात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी हा ठराव वाचून दाखवला. त्यानंतर आवाजी मतदानानं ठराव मंजूर झाला. त्यावर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला व सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
संबंधित बातम्या