मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : 'आम्ही पण असलेच धंदे केले, त्यामुळं तुम्ही...', अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी!

Ajit Pawar : 'आम्ही पण असलेच धंदे केले, त्यामुळं तुम्ही...', अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 23, 2022 04:44 PM IST

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt : कामकाजावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सभागृहात मंत्रीच हजर नसल्यानं मोठा गोंधळ उडाला.

Ajit Pawar In Maharashtra Legislative Assembly
Ajit Pawar In Maharashtra Legislative Assembly (HT)

Ajit Pawar In Maharashtra Legislative Assembly : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरू असून आता त्यात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्रीच सभागृहात उपस्थित नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चिमटे काढताना जोरदार फटकेबाजी केली आहे. पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन सभागृहात हजर नसल्यानं राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्ताधाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून मंत्री वरिष्ठ सभागृहातील सदस्यांना उत्तर देण्यासाठी गेल्याचं सांगण्यात आलं. परंतु या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

आम्हीही असलेच धंदे केलेत- अजित पवार

विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचं लक्षात येताच अजित पवार सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हणाले, सभागृहात विरोधकांना उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नाही, हे काय आहे?, आम्ही पण असलेच धंदे केलेले आहेत, त्यामुळं तुम्ही आम्हालाच सांगत आहात, राज्याचे आदिवासी मंत्री आहेत, पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन सभागृहात नाहीत, हे चुकीचं आहे, वरच्या सभागृहानं सांगायचं मंत्री खालच्या सभागृहात आहेत आणि खालच्या सभागृहानं सांगायचं मंत्री वरच्या सभागृहात आहेत, आम्हीही असले धंदे केलेले आहेत, आणि आता तुम्ही आम्हालाच सांगत आहात, असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केली आहे.

जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा...

जेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा आम्ही असं केलं नाही, मी स्वत: खालच्या सभागृहात असायचो आणि शंभुराजे देसाई हे वरच्या सभागृहात असायचे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीनं वागणं बरं नाही, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारला घेरलं आहे.

मुख्यमंत्री सभागृहात आहेत मग मंत्री का नाही- विधानसभा अध्यक्ष

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात मंत्री हजर नसल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्र्यांना चांगलंच सुनावलं आहे. मुख्यमंत्री सभागृहात आहेत म्हणून इतर मंत्र्यांनी सभागृहात हजर रहायचं नाही का?, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं कोण देणार?, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना झापलं आहे.

WhatsApp channel