मुंबईतून आलेली एक बातमी दिल्ली पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केलेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिष्णोई गँग चर्चेत आली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना ही माहिती मिळाली आहे की, दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने नुकताच एक खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे लक्ष्य श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाही होता. आफताब सध्या तिहारच्या तुरुंग क्रमांक चारमध्ये आहे. बिश्नोई टोळीच्या या खुलाशानंतर तिहारमध्ये आफताबची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु अलीकडील घडामोडी पाहता तिहार अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवकुमार गौतमने आपल्या कबुली जबाबात सांगितले होते की, आफताब पूनावाला देखील त्याच्या टोळीच्या टार्गेटवर आहे. आफताब अजूनही टोळीच्या निशाण्यावर असून कारागृहातच त्याच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. या वृत्तानंतर अधिकारी हाय अलर्टवर असून संभाव्य धोक्याचा तपास करताना आफताबच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याची खात्री केली जात आहे.
२०२२ मध्ये वसईतील श्रद्धा वालकर या महिलेची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने दिल्लीत निर्घृण हत्या केली होती. यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. यानंतर हे तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकले गेले. हे प्रकरण देशभर चर्चेत आले होते आणि त्याला जातीय रंगही देण्यात आला होता. ही हत्या मे २०२२ मध्ये करण्यात आली होती आणि आफताबला नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आफताबविरोधात आयपीसीच्या कलम ३०२ आणि २०१ अन्वये हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले होते.
श्रद्धा वालकर पालघरची रहिवासी होती, मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना तिची आफताबसोबत ओळख झाली होती. यानंतर दोघंही त्यांच्या कुटुंबांपासून लांब दिल्लीत रहात होते. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असताना आफताबने श्रद्धाचा खून केला होता. आफताब मुस्लिम असल्याने श्रद्धाच्या कुटूंबाचा त्यांच्या नात्याला विरोध होता.