'सलमान खानला जो मदत करेल, त्याला..'; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'सलमान खानला जो मदत करेल, त्याला..'; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली

'सलमान खानला जो मदत करेल, त्याला..'; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली

Oct 13, 2024 03:28 PM IST

baba Siddique murder case : या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं पण तू आमच्या भावाचं नुकसान केलंस. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक करत आहेत, एकेकाळी तो दाऊदसोबत मोक्का कायद्यात आरोपी होता

सलमान खान व बाबा सिद्दीकी
सलमान खान व बाबा सिद्दीकी (PTI)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. या हत्याकांडानंतर काही तासांनी कुख्यात बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. सध्या केंद्रीय यंत्रणा त्याची सत्यता तपासत आहेत. ही पोस्ट शुभू लोणकर याच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आली असून तो बिश्नोई टोळीचा साथीदार शुभम रामेश्वर लोणकर असू शकतो.  शुभम लोणकर याला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अकोला येथून अटक करण्यात आली होती. बिश्नोई टोळीशी त्याचे घट्ट संबंध असल्याचे मानले जाते. पोलिसांनी शुभमची चौकशी केली असता त्याने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून कुख्यात टोळीत सामील झाल्याची कबुली दिली होती.

शुभू लोणकरच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं पण तू आमच्या भावाचं नुकसान केलंस. बाबा सिद्दीकी एकेकाळी दाऊदसोबत मोक्का कायद्यात होता. अनुज थापन आणि दाऊद यांना बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं हे त्याच्या मृत्यूचं कारण आहे. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो त्याचा हिशोब केला जाईल.  आमच्या कोणत्याही भावाला कोणी ठार मारले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आम्ही यापूर्वी कधीही हल्ला केलेला नाही. जय श्रीराम, जय भारत.

वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी रात्री राष्ट्रवादीचे 66 वर्षीय नेते बाब सिद्दीकी यांची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. यात सुपारी देऊन हत्या, व्यावसायिक वैमनस्य किंवा वसाहत पुनर्वसन प्रकल्पावरून मिळालेल्या धमक्या या बाबी विचारात घेऊन तपास सुरू केला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची पूर्वनियोजित कट रचून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

पोलिसांनी गुरमेल बलजीत सिंग (वय २३, रा. हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (वय १९, रा. उत्तर प्रदेश) या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींवर हत्या, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

विद्यार्थी जीवनापासून काँग्रेसचे सदस्य असलेले बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा होती. या धक्कादायक घटनेनंतर विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय होते. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी विविध प्रकारे पीडितांची सेवा करून अनेकांची वाहवा मिळवली होती.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर