कॅबिनेट बैठकीसाठी शाही खर्च; ३१ हजाराची हॉटेल रुम तर दीड हजाराचं जेवणाचं ताट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कॅबिनेट बैठकीसाठी शाही खर्च; ३१ हजाराची हॉटेल रुम तर दीड हजाराचं जेवणाचं ताट

कॅबिनेट बैठकीसाठी शाही खर्च; ३१ हजाराची हॉटेल रुम तर दीड हजाराचं जेवणाचं ताट

Published Sep 15, 2023 05:22 PM IST

छत्रपती संभाजीनगर मध्ये होऊ घातलेल्या कॅबिनेट बॅठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्काम रोजचे ३२ हजार रूपये भाडे असलेल्या एका अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Lavish expenses for State Cabinet Meeting: Vijay Wadettiwar
Lavish expenses for State Cabinet Meeting: Vijay Wadettiwar

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या, १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आतापर्यंत मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा ‘सुभेदारी’ या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम रोजचे ३२ हजार रूपये भाडे असलेल्या एका अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.’ अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कॅबिनेट बैठकीसाठी गेलेल्यांना विश्रांतीला छत्रपती संभाजीनगर शहरातील एक फाइव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुती सरकारच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. याबद्दल माहिती देताना वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की फाइव स्टार हॉटेलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांना राहण्यासाठी ३० रूम बुक करण्यात आल्या असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. सर्व सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात ताज हॉटेलच्या ४० रूम बुक करण्यात आल्या आहेत. तर उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेल मध्ये ७० रूम आणि अजंता अॅम्बेसेडरमध्ये ४० रूम बुक करण्यात आल्या आहेत. सुरक्षा रक्षक आणि वाहनचालकांसाठी महसूल प्रबोधिनीमध्ये १०० व पाटीदार भवनमध्ये १०० रूम बुक करण्यात आल्या आहेत. इतर अधिकाऱ्यांसाठी वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे या ठिकाणी २० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. तर नाशिक येथून आणखी एकूण १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार रुपये असणार आहे. यावरून दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Whats_app_banner