Latur Crime News: लातूर येथून एक मनाला चटका लावणारी बातमी पुढे येत आहे. शहरातील खासगी कोचींग क्लासच्या इमारतीवरून एका १४ वर्षांच्या मुलाने उडी मारून आपले जीवन संपवले. कौटुंबिक कलहातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. त्याने इमारतीवरून उडी मारल्याने तो जखमी झाला होता. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. प्रकरणी लातूर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शैलेश अनिल शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. शैलेश हा दहावीत आहे. तो चाकूर तालुक्यातील गांजूर येथील रहिवासी आहे. शैलेशला पुढील शिक्षणासाठी ट्याच्या घरच्यांनी लातूरला पाठवले होते. तो लातूर येथे घर भाड्याने घेऊन राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी दहावीच्या फाउंडेशन कोर्ससाठी नालंदा कॅम्पस या खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता.
दरम्यान, त्याला त्याला गावाला जायचे होते. मात्र, त्याला त्याच्या घरच्यांनी त्याला गावी येऊ दिले नाही. यामुळे तो नाराज झाला होता. या रागाच्या भरात शैलेश हा त्याच्या क्लासला गेला. क्लासच्या चवथ्या मजल्यावर जाऊन त्याने कसलाही विचार न करता उडी मारली. या घटनेत शैलेश हा गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी तातडीने दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उंचावरून पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उद्योग भवन परिसरातील नालंदा कॅम्पस येथे ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर व पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरुवातीला त्याची ओळख पटत नसल्याने बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच शिंदे कुटुंबीय देखील त्याचा शोध घेत होते. अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याचे कुटुंबीय पोहोचले तेव्हा त्यांना मुलांबद्दल ऐकून धक्का बसला.
शैलेशहा शिंदे परिवारातील एककुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हे शेतकरी आहेत. तर त्यांना दोन मुली आहेत. त्यांना त्यांचा मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा होती. त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याला खोली करून लातूर येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, शैलेशच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.