Latur Neet Paper leak case : लातूर येथे नीट पेपर लिक प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. हे शिक्षक लातूर येथून क्लासच्या माध्यमांतून नीट गुणवत्ता वाढीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणाचे बीड कनेक्शन देखील पुढे आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकांच्या चौकशीतून १४ पैकी ८ विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्रे सापडली आहे. यातील सात मुले ही बीड येथील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा बीडमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहेत.
नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परीक्षा घोटाळ्याचे कनेक्शन लातूरनंतर आता बीडपर्यंत पोहोचले आहे. एटीएसच्या पथकाने लातूर येथून दोन शिक्षकांना अटक केली असून आणखी एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लातूर जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे विद्यार्थ्यांकडून परीक्षेत गुणवाढ करून देण्यासाठी लाखो रूपये घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि संजय जाधव यांनी चौकशीत मोठी माहिती पोलिसांना दिली आहे.
अटकेतील आरोपी मुख्याध्यापक पठाण व शिक्षक जाधव याच्या मोबाइलमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे सापडली होती. हे प्रवेश पत्र लातूर व बीड जिल्ह्यातील मुलांचे असल्याचे पुढे आले आहे. यातील काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील मुलांची देखील चौकशी होणार आहे.
तपास पथकाने या प्रकरणी लातूर-दिल्लीचे कनेक्शन असणाऱ्या इरण्णा कोनगलवारचा मोबाईल नांदेड एटीएसने जप्त केला. त्याच्या मोबाईलमध्ये राज्यातील अनेक एजंटांची माहिती पुढे आली आहे. त्यांची माहिती तपास पथकाने गुप्त ठेवली आहे. लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती आहे.
नीट घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने गुजरातमध्ये छापेमारी केली आहे. गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यात महत्वाची माहिती सीबीआयचे पथकाला मिळाली असल्याचे पुढे आले आहे. हे छापे गुजरातमधील आनंद, खेडा, अहमदाबाद व गोध्रा या चार जिल्ह्यांतील टाकण्यात आले असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.
लातूर नीट प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव याची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. यातील महत्वाचा आरोपी गंगाधर याची देखील चौकशी सीबीआय करणार आहे. लातूर एटीएसचे पथक देखील तयाची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या