नीटपेपर लीक प्रकरणावरून देशभरात गदारोळ माजला असून हा मुद्दा लोकसभा अधिवेशनातही गाजण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता देशपातळीवर गाजलेल्या या पेपर लीक प्रकरणाचे कनेक्शन लातूरपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणात दुसरा शिक्षक संजय तुकाराम जाधव (मूळ रा. लातूर, नोकरी सोलापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तिसरा आरोपी इरण्णा याच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.
पेपर लीक प्रकरणात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण यांना यास सोमवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले आहे की, दिल्लीतील आरोपीसोबत विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार झाल्याचे संदर्भ आहेत.
अटकेत असलेला आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण याला २ जुलैपर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, केंद्र प्रमुखाने त्याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे. २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीटमध्ये गुणवाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा कृष्णाजी कोनगलवार (देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजार आधी घेतले होते. त्यानंतर पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक असलेला आरोपी पठाण कोठडीत असून, दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधवयाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. मात्र त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
इरण्णा कोनगलवार हा उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीला आहे. तो लातूर येथून उमरग्याला ये-जा करतो. लातुरातील संशयित आरोपी शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरण्णाला पाठवीत होते. इरण्णा ती पुढे दिल्लीला गंगाधरकडे पाठवीत होता. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवीत होता व त्याच्याच माध्यमातून दिल्लीशी कनेक्शन सुरू होते, अशी माहिती होती. मात्र विद्यार्थी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले याचा तपास सुरू आहे.