Latur Accident : लातूरमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका टाटा सुमोने भरधाव वेगातील ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघात दोन महिलांसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदपूर तालुक्यातील किनगाव आंबेजोगाई रोडवरील दगडवाडी येथे घडली. या घटनेत टाटासुमोचाचक्काचूर झाला. यामुळे गाडीत अडकलेल्या इतर प्रवाशांना दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.
विजयमाला गंगाधर सिरसाट (वय ४५), सावित्री हरी सिरसाट व एका लहान मुलाचा (नाव संजू शकले नाही) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर टाटा सुमो चालक अच्युत सिरसाट, जयश्री ज्ञानेश्वर सिरसाट अशी जखमींची नावे आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
या घटनेची हकिगत अशी की, अहमदपूर तालुक्यातील किनगाव आंबेजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे तेलंगाना येथून एक ट्रक काही माल घेऊन आंबेजोगाईकडून अहमदपूरकडे जात होता. यावेळी हा ट्रक दगडवाडी येथे एका हॉटेल समोर थांबला असतांना, किनगाव कडून जोडवाडीकडे जाणाऱ्या टाटा सुमोने या उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धड दिली. या भीषण अपघातात दोन महिलांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीत काही प्रवासी अडकले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी दरवाजा तोडून बाहेर काढले.
राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. रविवारी धुळे येथील अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना कोल्हापुरात आज सकाळी भीषण अपघात झाला. कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात एका कंटेनरने ७ ते ८ वाहनांना धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर, ६ जण गंभीर जखमी आहेत. हा कंटेनर बेळगावहून कोल्हापूरला जात होता.