लातूरमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आह. या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ आज (गुरुवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारुती स्विफ्ट डिझायर कारला ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. कारमधून या महिला उदगीरहून एकुरगाकडे जात होत्या. कार एकुरगा गावाजवळ येताच समोरून आलेल्या भरधाव आयशर टेम्पोने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा चुराडा झाला तर अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या.
मंगलबाई गोविंद जाधव (वय ५५ रा. एकुरका), प्रतिभा संजय भंडे (वय ३० रा. दावणगाव), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २५ रा. होणाळी), अन्यना रणजित भंडे (वय १४, राहणार दावणगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत. या चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जखमीना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उदगीर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिला एकमेकांच्या नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालय परिसरात मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणी उदगीर पोलिसांत नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.