Pune Hinjewadi water filter viral video : पुण्यात काही दिवसांपूर्वी डासांच्या थव्यांच्या वादळाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे पुण्यातील स्वच्छतेचा आणि पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतांना आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील आयटी पार्क असलेल्या हींजेवाडी येथे एका सोसायटीत राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरातील वॉटर पयुरिफायर मधील फिल्टर कँडलवर लाल अळ्या आढळल्या आहेत.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याने हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे पुढे आले आहे. नागरिकाने या अळी बद्दल माहिती देत ती आरोग्यासाठी किती घातक आहे याची माहिती देत महापलिका प्रशासनाला काही प्रश्न देखील विचारले आहे. दरम्यान,हा प्रकार पाहून आयटी हबमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
जयदीप बाफना यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांच्या घरातील वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी हा व्हिडिओ १५ फेब्रुवारीला पोस्ट केला आहे.
बाफणा यांनी केलेल्या पोस्टमध्ये महापलिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. ऐवढेच नाही तर त्यांनी या अळी बद्दल माहिती दिली असून ती किती घातक आहे याची देखील माहिती दिली आहे.
बाफणा यांनी लिहिले आहे की ही अळी म्हणजे Chironomid लार्वा आहे, Chironomidae कुटुंबाचा ही अळी एक भाग आहे. ज्याला प्रौढ अवस्थेत "नॉन-चावणारे मिडजेस" आणि लार्व्हा अवस्थेत "रक्तवर्म" असे संबोधले जाते. ही अळी जर वाकड आणि हिंजवडीपर्यंत पोहोचली असेल तर याचा अर्थ नदीचे मोठे प्रमाणात प्रदूषण झाले आहे. अळीचा गडद लाल रंग हा खराब पाण्याची गुणवत्ता दर्शवतो. हा फक्त एका घरातील प्रश्न नसून ८०० फ्लॅटपैकी किमान २० टक्के घरातील नळाच्या पाण्यात ही अळी सापडली आहे, हे घातक असल्याचं जयदीप बाफना यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
या सगळ्या धोकादायक घटना घडत असताना पुणे महापालिका नदी सुधार प्रकल्पाकडे लक्ष देत आहे. हे प्रकल्प वतावरणाससाठी हानिकारक आहे. पुण्यातील नदीकाठचे आरएफडी, सांडपाणी, ड्रेनेज, कचरा, जलकुंभ, डास, मलेरिया, डेंग्यू व इतर असंख्य समस्या दूर करण्यात याव्या आणि उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिक करत असून देखील महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
पुण्यातील हिंजवडी परिसरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यात अनेक सोसायट्यांना पाणी नदी किंवा विहिरीतून दिलं जातं. मात्र या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.