land slide on Sinhgad : पुणेकरांचे आवडते ठिकाण असलेल्या किल्ले सिंहगडावर मध्यरात्री मोठी दरड कोसळली. ही घटना सकाळी लक्षात आली. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू असून प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुपारी किंवा संध्याकाळ पर्यंत दरड हटवण्याचे काम पूर्ण केले जाणार असून यानंतर हा रस्ता पुन्हा सुरू केला जाणार आहे. दरम्यान, ही घटना रात्री घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
किल्ले सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे सिंहगड परिसरात दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. ज्या ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळली तेथे वन व्यवस्थापन समितीने दरड कोसळण्याच्या शक्यता असून जास्त वेळ थांबू नये असे सूचना फलक देखील लावण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री गड परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला आहे.
सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती वनविभाग आणि प्रशासनाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासानाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून वनव्यवस्थापन समितीतर्फे दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसिबीच्या साह्याने दरड हटवली जात असून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. गडावरील वाहनतळापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली आहे.
सिंहगड परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे येथील काही परिसर हा दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्यावर व मुख्यरस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे गड परिसरात पर्यटन करण्यासाठी येणाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा दरड कोसळल्याने गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
पुण्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. किल्ले सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंहगडावर जात आहे. त्यामुळे गडावर जातांना काळजी घेण्याच्या सूचना वनविभाग आणि वन व्यवस्थापन समितीने दिल्या आहेत.
संबंधित बातम्या