Ladki bahin yojana Application scrutiny : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निकालांना कलाटणी मिळाली. मात्र आता या योजनेलाच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चार चाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यामुळे आता अशा अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीत नियमबाह्य आढळणारे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. तसे झाल्यास १५ ते २० टक्के म्हणजेच जवळपास ३५ ते ५० लाख महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीवर भाष्य केले होते. तसेच जे निकषात बसणार नाहीत ते अर्ज बाद केले जातील, असे संकेत दिले होते. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला लाडक्या बहिणींची गरज नसल्याची टीका केली होती. तर याबाबत आलेल्या बातम्यांमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे महिला बालकल्याण खात्याच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता माहिती समोर आली आहे की, लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची छाननी होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधीपासून छाननी सुरू होती. त्यातील १६ लाख अर्जांची छाननी बाकीहोती. ती आता पूर्ण केली जाणारअसल्याची माहितीआहे. या १६ लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने योजनेची कार्यवाही थांबली होती. पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा योजनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित अर्जांची छाननी देखील सुरू झाली आहे.
आतापर्यंत राज्यातील जवळपास २ कोटी ३४ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभमिळाला आहे. यात १६ लाख अर्जांची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे. निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्याने या सोळा लाख अर्जांची छाननी बाकी होती. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. आता या सर्व अर्जांची छाननी करून या लाभार्थ्यांनालाभ दिला जाणार आहे.
आदिती तटकरे यांनी या आधीही लाडकी बहीण योजनेवरून स्पष्टीकरण दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, लाडकी बहीण योजनेत जवळपास २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत प्राप्त तक्रारींवर विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
संबंधित बातम्या