महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका ठाम होण्यास मदत होणारअसल्याचे सरकारने म्हटले आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. आता सरकारकडून या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
सरकारकडून लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. तर लाभदायी प्रणाली समिती अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ही योजना राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी याआधीही अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी राज्यभरात महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकारने यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून पैसे जमा होण्याची तारीखही जाहीर केली आहे.
राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहे. या दिवशी दोन महिन्याची रक्कम एकदम म्हणजेच ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
ग्रामपंचाय, नगर पंचायत/परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे पात्र महिलांना अर्ज देता येतील. याचबरोबर पोर्टल, मोबाइल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नसेल त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका,वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्समध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सक्षम बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र,राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १ हजार ५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
संबंधित बातम्या