Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांना अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. त्यातच सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अर्जांची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्याच बँक खात्यात मासिक रक्कम जमा होईल. असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यातयेत असताना आता माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारी पत्रक दाखवत योजनेच्या निकषाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) निकषांत बदल करण्यात आल्याचं,लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाची स्थिती असून आता, याबाबत स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.
माजी मंत्री व विद्यमान आमदार अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, की या योजनेबाबत अफवा पसरण्याचं काम सुरू आहे. मुळात या योजनेच्या निकषात कोणतेही बदल झालेले नाहीत. डिसेंबरचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. आतापर्यंत पाच महिन्याचे हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. योजनेची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात योजनेची रक्कम १५०० रुपयावरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिल्याने आता महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या