Ladki Bahin Yojana Updates : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली लाडकी बहीण योजना महायुतीसाठी मोठी गेंमचेंजर ठरली व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. मात्र निवडणुकीनंतर प्रत्येक महिन्याला योजनेचा हफ्ता मिळायला उशीर होत आहे. त्यातच अनेक लाडक्या बहिणींची नावे वगळ्यात आल्याचेही सांगितले जात असताना आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी २०२५ चा हफ्ता मिळण्याची तारीख सरकारने सांगितली आहे. २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे.या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की,२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी विभागाला मिळणार आहे. अर्थसंकल्पातही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल.
आदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन केले जात आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही २कोटी ४६लाख महिलांना दिला जात आहे. काही महिलांबाबत तक्रार आली होती. बनावट केसेस फारच कमी होत्या त्यांना लाभ देणे बंद केले जाईल. त्यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असे मला वाटत नाही.
जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंत ६ हप्ते जमा झाले आहेत. जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दल काहीच माहिती समोर येत नव्हती. संक्रातीच्या मुहूर्तावर हा हप्ता जमा होणार, अशी चर्चा होती. यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार असे बोलले जात होते. मात्र संक्रातीला महिलांच्या खात्यात पैसे आलेच नाही. आता २६ जानेवारीच्या आधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात असून त्यासाठी महिलांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
हा हफ्ताही मागील हफ्त्याप्रमाणे १५०० रुपयांचा असणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महिलांच्या सातव्या हफ्त्याचे वितरण सुरू केले जाईल, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या