Ladki Bahin Yojana Scam : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेना आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील जमा झाले. मात्र, या योजनेत बोगस लाभार्थी देखील समोर येऊ लागले आहे. सातारा येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर ३० विविध आधार क्रमांक टाकून या योजनेसाठी अर्ज करत लाभ मिळवला होता. या प्रकरणी सताऱ्यातील वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
सातारा येथील एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पत्नीच्या नावार ३० विविध आधार क्रमांकाचा वापर केला होता. हे सर्व अर्ज मंजूर झाले होते. त्यांच्या खात्यात तब्बल ७८ हजार रुपये जमा झाले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने या योनेची जास्तीत जास्त रक्कम लाटण्यासाठी पत्नीचे वेगवेगळ्या वेशातील फोटो काढून ते विविध आधार कार्ड जोडून बँकेत सादर केले होते. तसेच या सर्व अर्जाला त्याने एकच मोबाईल नंबर लिंक केला. होता. ३० पैकी त्याचे २६ अर्ज मंजूर होऊन त्याच्या खात्यात रक्कम देखील जमा झाली होती. मात्र, पोलिस अधीक्षक शेख यांनी केवळ एकाच खात्यात रक्कम जमा झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
खारघर येथील पूजा महामुनी (वय २७) या महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यांनी अनेक वेळा अर्ज करून देखील त्यांचा फॉर्म हा सबमीट होत नव्हता. १५ ऑगस्टनंतर पात्र महिन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. यानंतर महामुनी यांच्या नावावर देखील रक्कम जमा झाली होती. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बँकेत जात त्यांनी अर्ज भरला नसल्याचं सांगितलं. याची तक्रार महामुनी यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना केली. या प्रकरणाचा शोध घेतला असता या प्रकरणाचं बिंग फुटलं. पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला होता. त्यांचे आधारकार्ड ही सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईलशी लिंक असल्याचंन समजल्यावर या प्रकरणी पनवेल तहसिलदारांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत आरोपी पती पत्नीला अटक केली आहे.
सातारा एसपी समीर शेख यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले सातारा जिल्ह्यात वडूस पोलिस ठाण्यात आम्ही एक गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीने एकाच खाते क्रमांकावर 'लाडकी बहिन योजने' अंतर्गत बनावट फॉर्म सादर केले. या साठी त्यांनी अनेक आधार कार्ड वापरून बोगस पद्धतीने हे फॉर्म भरले. त्यांनी जास्तीत जास्त रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचं बिंग फुटलं असून आम्ही पती पत्नीला अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.