Ladki Bahin Yojana Scam : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेची मुदत एक महिन्यांनी वाढवली आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत पहिल्या दोन महिन्याचे ३००० हजार रुपये रक्षाबंधनाच्या आधीच जमा झाले आहेत. अजूनही या योजनेत नाव नोंदणीसाठी महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेते देखील मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे.एका व्यक्तीने पत्नीच्या नावे लाडकी बहीण योजनेचे तब्बल३०अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क ३० अर्ज दाखल करत सरकारचे हजारो रूपये लाटले आहेत.
दाखल केलेल्या ३० अर्जांपैकी २६ अर्ज पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे तीन हजारप्रमाणे ७८ हजार रुपये मिळाले आहेत. या प्रकरणाची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी या व्यक्तीने आपलेच महिलांच्या वेशातील अनेक फोटो काढले वेगवेगळे कपडे घातले. पंजाबी सूट, पोलकं, साडी, विविध केश रचना करत त्याने स्वतःचेच विविध अँगलने फोटो काढले. त्याने असे २७ प्रकारच्या वेशभुषा करून फोटो काढले. या प्रत्येक फोटोला त्याने वेगवेगळ्या महिलांचे आधार कार्ड जोडले व त्याला एकच मोबाईल नंबर लिंक केला. विशेष म्हणजे त्याचे २६ अर्ज मंजूर झाले. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात योजनेची रक्कम सुद्धा जमा झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एकाच नंबरवर तब्बल ३० लाभार्थी लिंक असल्याचंही आढळलं आहे. या बाबत पनवेल तहसील कार्यालयात तक्रार करून योग्य कारवाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु,अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पनवेल तहसील कार्यालयाने आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक शोधला. त्यावर कॉल केला. त्यात योजनेसंबंधीची माहिती सांगत,एका प्रक्रियेसाठी ओटीपी मागितला. त्यावेळी सिस्टममध्ये ३० लाभार्थ्यांसाठी एकच मोबाईल क्रमांक वापरल्याचे समोर आले.
नवी मुंबईतील खारघर येथील पूजा महामुनी (वय २७) यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांचा अर्ज सबमिट होत नव्हता. दरम्यान १५ ऑगस्टनंतर अनेक पात्र महिन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपला अर्जच सबमिट न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महामुनी यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे समोर आले. त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक असल्याचे समजले. याचा तपास केला असता या व्यक्तीने तब्बल ३० अर्ज सादर केल्याचे समोर आले.
पूजा महामुनी यांनी २९ऑगस्ट रोजी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरुन अर्ज सादर केला. त्यावेळी तुमचा अर्ज अगोदरच प्राप्त झाला असून तो मंजूर झाल्याचा सिस्टिम जनरेटेड मेसेज आला.