राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही यामहिन्यातच जमा झाला आहे. या योजनेचा सरकारकडूनही जोरदार प्रचार होत असून अनेक जिल्ह्यात वचनपूर्ती मेळावे भरवले जात आहेत. वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिलांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. २९ महिलांना घेऊन जाणारी बस २० फूट खोल दरीत कोसळली आहे.
माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात हा अपघात झाला आहे. या अपघातात ८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
रानवडे कोंड येथून २९ महिला लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगावला निघाल्या होत्या. मांजरोने घाटात येताच चालकाचे नियंत्रण सुटले व बस खोल दरीत कोसळली. यामध्ये जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माणगावमधील धनसे क्रीडांगणावर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी लाडक्या बहिणींना गावागावांतून आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस सोडल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील रानवडे कोंड येथून काही महिलांना घेऊन येत असताना एका बसला अपघात जाला. अपघातग्रस्त बस म्हसळा येथून माणगावकडे येत असताना अपघात झाला.
सुमारे ५० हजार नागरिकांची बासण्याची आसन व्यवस्था होईल एवढी तयारी या मैदानात करण्यात आली आहे. १० एकरच्या भव्य जागेवर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमासाठी ५०० पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.
राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. राज्यातील २ कोटीहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये पाठवण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये दिले. आता ऑक्टोबरमध्ये महिलांना दिवाळीनिमित्त नोव्हेंबरचा हफ्ता आगाऊ देण्यात आला. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ७५०० रुपये मिळाले आहेत.