Eknath Shinde News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र, त्याआधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. आमचे सरकार देणारं आहे, घेणारे नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो, असेही शिंदे म्हणाले.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात, राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्रा?प्त अर्जदारांना थेट खात्यांवर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३१ जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज दाखल केले, त्यातील पात्र माता-भगिनींना देखील दुसरा टप्प्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील एकूण दीड कोटी महिलांनी अर्ज केला. बुधवारी ३ लाख भगिनींच्या खात्यावर ९९० कोटी रुपये जमा झाले आहेत. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत. आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार, त्याची सुरुवात झाली. विरोधकांना योजना बंद करायची होती. यासाठी ते कोर्टात गेले. मात्र, कोर्टाने त्यांन फटकारले आणि त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. याआधीचे सरकार घेणारे होते. त्यामुळे महिलांनी आता सावत्र भावांपासून सावध राहा'. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्ट़नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.'
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते जमा होणार आहेत. परंतु, ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी लिंक जोडले की नाही, याची तपासणी करून घ्यावी.