Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे आता सरकारी कामांवर याचा काहीसा प्रभाव पडणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या काही सरकारी आर्थिक योजना बंद करण्यात याव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिली आहे. या सूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा योजनांसाठी लागणारा निधी थांबवला गेला आहे. त्यामुळे निवडणुका पार पडेपर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे त्यासाठी पात्र असलेल्या महिलांना मिळणार की, नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, यावर आता उत्तर देण्यात आले आहे.
राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच एकत्र दिले होते. त्यामुळे आता ही योजना बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेदरम्यानच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता ‘लाडकी बहीण योजने’च्या पुढच्या हप्त्याची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘लाडकी बहीण योजने’चा निधी थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर ही योजना बंद होईल, अशी अफवा उठली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या अफवेचे खंडन करत ‘लाडकी बहीण योजने’चा पुढचा महिलांच्या खात्यात कधी येणार, हे देखील सांगितले आहे.
आदिती तटकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची अंमलबजावणी जुलै २०२४पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै,ऑगस्ट,आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!’
आदिती तटकरे यांनी ही पोस्ट शेअर करताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या पोस्टला रिशेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले आहे. राज्यातील महिलांनी अशा अफवांना आणि थापांना बळी पडू नये, असं उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.